वसुली झालेल्या रकमेवर व्याज आकारणे थांबवा!
विजय मल्ल्या यांची उच्च न्यायालयात विनंती : परतफेडीचा तपशिल देण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेंगळूर
घेतलेल्या कर्ज वसूल केल्यानंतरही बँका व्याज वसूल करत असल्याचा आरोप मद्यसम्राम विजय मल्ल्या यांनी केला आहे. आपण परतफेड केलेल्या कर्जाचा तपशिल द्यावा, अशी याचिका विजय मल्ल्या यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात दाखल केली आहे. मंगळवारी न्यायमूर्ती ललिता कन्नेगंटी यांच्या पीठासमोर सदर याचिकेवर सुनावणी झाली. रिट याचिकेत बँकांकडून हिशेब कसे मागता, असा प्रश्न न्यायालयाने विजय मल्ल्या यांचे वकील सज्ज पुवय्या यांना केला तसेच आक्षेप दाखल करण्यासाठी बँकांच्या वकिलांना सूचना देत सुनावणी 12 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली.
युनायटेड ब्रुअरिज होल्डिंग्ज लि. (युबीएचएल)च्या मालकीच्या तत्कालिन किंगफिशर एअरलाईन्सवर आपले आणि आपल्या कंपनीचे किती कर्ज बाकी आहे, याचा तपशिल सादर करण्याचे निर्देश बँकांना द्यावेत, अशी याचिका विजय मल्ल्या यांनी उच्च न्यायालयाकडे केली आहे. बँकांनी आधीच वसूल केलेल्या रकमेवर व्याज आकारणे थांबवावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
कर्जापेक्षा अधिक वसुली!
सदर याचिकेवर न्यायमूर्ती ललिता कन्नेगंटी यांच्या पीठासमोर विजय मल्ल्या यांचे वकील सज्जन पुवय्या यांनी युक्तिवाद केला. कर्जाची थकबाकी बँकांनी आधीच वसूल केली आहे. युनायटेड ब्रुअरिज ही होल्डिंग्ज कंपनी असून किंगफिशर कंपनीने बँकांकडून कर्जे घेतली आहे. या कर्जावर विजय मल्ल्या यांनी हमी दिली आहे. यासंबंधी कर्ज वसुली प्राधिकरणाने (डीआरटी) कर्जवसुली प्रमाणपत्र दिले असून वसुली प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार विविध मालमत्तांच्या जप्तीची प्रक्रिया सुरू आहे. कर्जाच्या प्रमाणापेक्षा अधिक वसूल करण्यात आले आहे. डीआरटीने दिलेल्या प्रमाणपत्रात 10 हजार कोटी रु. वसूल केल्याचे सांगितले आहे. मात्र, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 14 हजार कोटी रु. वसुली केल्याचे संसदेत सांगितले आहे. आपण घेतलेल्या कर्जापेक्षो बँकांनी अधिक वसुली केली आहे. त्यामुळे बँका किती प्रमाणात कर्जवसुली केली आहे, याची माहिती देत नाहीत. त्यामुळे किती रक्कम वसुली झाली, याबाबत तपशिल देण्याचे निर्देश बँकांना द्यावेत, अशी विनंती विजय मल्ल्या यांच्यामार्फत वकील सज्जन पुवय्या यांनी दिली.
किंगफिशर आणि युबीएचएलने 6,203 कोटी रुपये आणि 11.5 टक्के व्याज भरणे आवश्यक होते. यासंबंधी अंमलबजावणी संचालनालयाने 16 जुलै 2021 रोजी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात 7,181 कोटी रुपये वसुली झाल्याचे सांगितले आहे. मात्र, डीआरटीने दिलेल्या प्रमाणपत्रानुसार 10,040 कोटी रुपये वसूल झाले आहेत, असे सज्जन पुवय्या यांनी न्यायालयात सांगितले.
इतर मुद्द्यांवर न्यायालयात आक्षेप घेता येत नाही!
बँकांच्यावतीने प्रतिवाद करताना वकील विक्रम हुयीलगोळ यांनी, विजय मल्ल्या देश सोडून गेले आहेत. ते निर्दोष असतील तर न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी भारतात परत येणे आवश्यक होते. संविधानानुसार न्यायालयात आव्हान देता येईल. मात्र, इतर मुद्द्यांवर आक्षेप घेणे शक्य नाही, से सांगितले. वाद-युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने केंद्र सरकार, बँकांसह प्रतिवाद्यांना नोटीस बजावून सुनावणी 12 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली.