केजरीवाल यांच्या कारवर दगडफेक ?
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आपण प्रचाराला निघालो असताना आपल्या कारवर दगडफेक करण्यात आली, असा आरोप आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. त्यांनी या कथित हल्ल्याचे उत्तरदायित्व भारतीय जनता पक्षावर असल्याचे अप्रत्यक्ष प्रतिपादनही केले. तथापि, भारतीय जनता पक्षाने त्यांचे आरोप फेटाळले असून केजरीवाल यांच्या कारने रस्त्यातील दोन कार्यकर्त्यांना धडक दिली. त्यामुळे समस्या निर्माण झाली असा पलटवार केला आहे. दिल्लीची विधानसभा निवडणूक आता जवळ येत असताना दोन्ही मुख्य पक्षांमधील द्वंदही शिगेला पोहचले आहे.
केजरीवाल यांच्या विरोधात नवी दिल्ली मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने प्रवेश वर्मा यांना उमेदवारी दिली आहे. प्रवेश वर्मा यांच्या कार्यकर्त्यांनीच आपल्या कारवर दगडफेक केली असे केजरीवाल यांचे म्हणणे आहे. या पक्षाने कितीही प्रयत्न केले तरी मी घाबरणार नाही, असाही दावा केजरीवाल यांनी केला. मात्र, केजरीवाल यांच्या कारने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना हेतुपुरस्सर धडक दिली. त्यामुळे हे कार्यकर्ते जखमी झाले आहेत, असा वर्मा यांचा आरोप आहे.
केजरीवाल यांची आणखी आश्वासने
दिल्लीत आम आदमी पक्षाचा विजय झाल्यास सर्व भाडेकरुंनाही विनामूल्य वीज आणि पाणी दिले जाईल, असे नवे आश्वासन केजरीवाल यांनी दिले आहे. तसेच माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. दिल्लीतील हवा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे, असेही प्रतिपादन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.