प्रेमविवाह केल्याच्या रागातून किराणा दुकानावर दगडफेक
कांचनवाडी (ता. करवीर) येथील घटना, १० जणांवर गुन्हा दाखल
कोल्हापूर
प्रेमविवाह केल्याच्या रागातून कांचनवाडी (ता. करवीर) येथे दुकानावर दगडफेक करण्यात आली. बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद बाबुराव जोती गुरव (वय ४६ रा. गुरव गल्ली, कांचनवाडी) यांनी करवीर पोलीस ठाण्यात दिली.
यानुसार पंकज शंकर भोसले, मोहन सखाराम भोसले, मयुर रघुनाथ भोसले, संभाजी सखाराम भोसले, धीरज धनाजी भोसले, दिपक आनंदा भोसले, अनिल धोंडीराम भोसले, धनाजी भवान्ना भोसले, संजय आनंदा भोसले, शंभुराजे पंकज भोसले (सर्व रा. कांचनवाडी ता. करवीर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चार महिन्यापूर्वी बाबुराव गुरव यांच्या मुलग्याने भोसले यांच्या कुटूंबातील एका तरुणीशी प्रेमविवाह केला आहे.
प्रेमविवाहानंतर हे दोघेही गावाकडे न येता बाहेरच स्थायिक झाले आहेत. रंगपंचमी निमित्त हे दोघे लग्न झाल्यानंतर प्रथमच गुरव यांच्या घरी आल्याची माहिती भोसले कुटूंबियांना मिळाली. त्यांनी गुरव यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गुरव यांच्या घराबाहेरील दुकानाबाहेरच्या बंद दरवाजावर दगडफेक करुन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. तसेच बाबुराव गुरव यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश बांबळे करत आहेत.