हरियाणातील नूह येथे ईबीवर दगडफेक
वृत्तसंस्था / चंदीगढ
हरियाणातील नूह येथे चाललेल्या बेकायदेशीर खाणकामाचा तपास करण्यासाठी गेलेल्या हरियाणा स्टेट एनफोर्समेंट ब्युरो किंवा ईबीच्या पथकावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात या पथकातील दोन अधिकारी जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. हल्लेखोरांनी ईबीकडून जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर्स आणि इतर वाहनेही सोडवून नेली. पोलीस घटनास्थळी उशीरा आल्याने हल्लेखोरांना पलायनाची संधी मिळाली, अशी माहिती देण्यात आली आहे.
या प्रकरणी एफआयआर नोंद करण्यात आला आहे. 22 अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा सादर करण्यात आला आहे. नूह या भागात लोहखनिजाच्या खाणी असून तेथे अवैध खाणकाम चालते अशी तक्रार राज्य सरकारकडे करण्यात आली होती. या तक्रारीसंबंधी तथ्य जाणून घेण्यासाठी ईबीचे पथक तेथे गेले होते. अवैध खाणकाम होत असल्याचे निदर्शनास येताच पथकातील अधिकाऱ्यांनी दोन ट्रॅक्टर्स आणि खाणकाम करण्यासाठी आणण्यात आलेली साधने, तसेच इतर वाहने आपल्या ताब्यात घेतली. ही कारवाई होत असतानाच तेथे 50 जणांचा जमाव जमला. या जमावाने पथकाला घेरुन दगडफेक करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे पथकाला स्वरसंरक्षणासाठी इतरत्र आसरा घ्यावा लागला. या दगडफेकीत ईबीचे दोन अधिकारी जखमी झाले. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
हल्लेखोरांचा शोध घेण्यास प्रारंभ
शुक्रवारी संध्याकाळी तक्रार सादर झाल्यानंतर पोलिसांनी त्वरित हल्लेखोरांचा शोध घेण्यास प्रारंभ केला आहे. लवकरच त्यांना अटक करुन न्यायालयात खेचण्यात येईल, असे प्रतिपादन पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे. तर अवैध खाणकामाविरोधात कारवाई थांबविण्यात येणार नसून पुढच्या वेळी पोलीस संरक्षण सुनिश्चित करुन कारवाई करण्यात येईल, असे ईबीने स्पष्ट केले आहे.