न्यू वंटमुरीमध्ये तुफान दगडफेक
जागेच्या वादातून घटना : तिघे जण जखमी, गावात बंदोबस्तात वाढ
बेळगाव : खुल्या जागेच्या वादातून न्यू वंटमुरी येथे बुधवारी दुपारी तुफान दगडफेकीची घटना घडली आहे. या घटनेत तिघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. या घटनेनंतर न्यू वंटमुरी येथे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. हालाप्पा शेट्ट्याप्पा वन्नुरी (वय 44), निंगव्वा मारुती वन्नुरी (वय 65), सत्यव्वा शेट्ट्याप्पा वन्नुरी (वय 67) तिघेही राहणार न्यू वंटमुरी अशी जखमींची नावे आहेत. घटनेची माहिती समजताच कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, बेळगाव ग्रामीणचे प्रभारी एसीपी जे. रघू, काकतीचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हालाप्पा वन्नुरी यांनी खरेदी केलेल्या जागेत बुधवारी शेड उभारण्याचे काम हाती घेतले होते.
त्याच गावातील परसाप्पा व त्यांच्या कुटुंबीयांनी याला आक्षेप घेतला. यावेळी वादावादीची घटना घडली. वादावादीनंतर तुफान दगडफेकीला सुरुवात झाली. दगडफेकीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यासंबंधी बुधवारी रात्री काकती पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता अद्याप एफआयआर दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. घरावर चढून कौले व दगडांचा मारा करण्यात आला आहे. शेड उभारण्यासाठी आणलेल्या पत्र्यावर दगड मारण्यात आले आहेत. या घटनेत तिघेजण किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. दोन वर्षांपूर्वी न्यू वंटमुरी देशभरात ठळक चर्चेत आली होती. एका महिलेला विवस्त्र करून खांबाला बांधून तिला मारहाण करण्यात आली होती. या घटनेतून गाव सावरत असतानाच बुधवारी खुल्या जागेच्या वादातून तुफान दगडफेक झाली आहे. गावात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.