For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘पोट’ करते वजन कमी...

06:38 AM Jul 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘पोट’ करते वजन कमी
Advertisement

सांप्रतच्या काळात ‘स्थूल’पणाच्या समस्येने साऱ्या जगाला ग्रासले आहे. भारतामध्येही ही समस्या वाढीला लागली असून लोकांच्या आरोग्यावर वाढत्या वजनाचा घातक परिणाम होत आहे. जीभेवर नियंत्रण ठेवल्याने आपले वाढलेले पोट कमी होते आणि पर्यायाने वजन कमी होते, असा समज दृढ आहे. म्हणून जो तो आपले ‘ढेरपोट’ मागे हटविण्याच्या प्रयत्नाला लागलेला दिसून येतो. तथापि, आपला वजन कमी करण्याचा मार्ग आपल्या पोटातूनच जातो, असे संशोधकांना आढळून आले आहे. वजन कमी करण्याचे रहस्य आपल्या जीभेत नव्हे, तर पोटातच दडलेले आहे, असे या महत्वपूर्ण संशोधनातून स्पष्ट झाले आहे. ड्यूक विद्यापीठाच्या संशोधकांनी आपल्या आतड्यांमधील अशा प्रकारच्या पेशींचा शोध लावला आहे, की ज्या पेशी आपल्या मेंदूला आपण खाणे केव्हा बंद करायचे आहे, याचा संदेश देतात. तो संदेश आपण ओळखू शकलो, तर कोणतेही औषध न घेता, किंवा घाम गळेपर्यंत व्यायाम न करताही आपण वजन नियंत्रणात ठेवू शकतो, असे या संशोधकांचे म्हणणे आहे. तेव्हा पोटातून मिळणारे संकेत ओळखणे महत्वाचे आहे.

Advertisement

संशोधकांनी या पेशींचे ‘न्यूरोपॉडस्’ असे नामकरण केले आहे. या पेशींची काम करण्याची पद्धत ‘रुचिरंध्रां’प्रमाणे किंवा ‘टेस्ट बडस्’ प्रमाणे असते. आपण खातो ती साखर किंवा तेल तसेच अन्य पदार्थ या पेशींचा कार्यान्वित करतात. हे पदार्थ पोटात पुरेशा प्रमाणात पोटात आले की या पेशी मेंदूला ‘आता खाणे पुरे’ असा इशारा करतात. पण, आपण खाण्यात इतके मग्न झालेलो असतो, की आपल्याला हा संदेश लक्षातच येत नाही. संशोधकांनी या पेशींकडून मिळणाऱ्या या संकेतांना ‘पोटात दडलेला सिक्स्थ सेन्स’ अशी ओळख दिली आहे. कित्येकदा आपण आपल्या मेंदूच्या सिग्नलच्या विरोधात कृती करतो. यालाच ‘भावने’ची ‘विचारां’वर मात असे म्हटले जाते. खाण्याच्या संदर्भात असा आज्ञाभंग आपल्याकडून सातत्याने होतो आणि वजनाची समस्या उद्भवते. संशोधक आता हा संकेत ओळखण्याची जाणीव कशी जागृत करायची, याचा उपाय शोधण्याच्या मागे आहेत. तसे काही साधन विकसीत करण्यात यश आले, तर खाणे केव्हा थांबवायचे हे आपल्याला स्पष्टपणे कळणार आहे. त्यामुळे कोणताही बाह्योपचार न करता वजन नियंत्रणात ठेवणे आणि त्यामुळे अनेक विकारांनाही दूर ठेवणे शक्य होणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.