हॉटमिक्स प्लॅन्टची चोरून विक्री लेंगरेवाडीतील घटना! 25 लाख 65 हजाराच्या मशिनरीवर डल्ला
दोघांवर गुन्हा
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील लेंगरेवाडी गावच्या हद्दीत असलेला ठेकेदाराच्या मालकीचा डांबर हॉटमिक्स प्लॅन्ट स्वत:च्या मालकीचा असल्याचे सांगून त्याची विक्री करण्याचा अजब प्रकार उजेडात आला आहे. तब्बल 25 लाख 65 रूपयाचा हॉटमिक्स प्लॅन्ट चोरून विक्री केल्याप्रकरणी शेटफळे व लेंगरेवाडी येथील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठेकेदार राहुल साळुंखे (कमळापूर ता. खानापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिपक शंकर पाटील (रा. शेटफळे) आणि बापुसाहेब सोपान लेंगरे (रा. लेंगरेवाडी) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 डिसेंबर 2023 ते 23 मे 2024 या कालावधीत लेंगरेवाडीच्या हद्दीतील सोपान लेंगरे यांच्या जमिन गट नं.212 मधुन या साहित्याची चोरी झाली आहे.
दिपक पाटील व बापुसाहेब लेंगरे यांनी संगनमत करून राहुल साळुंखे यांच्या मालकीचा डांबर हॉटमिक्स प्लॅन्ट स्वत:च्या मालकीचा असल्याचे सांगुन मुळ मालकाच्या संमतीशिवय लबाडीने चोरून नेला. आणि त्याची विक्री मधुकर साळुंखे(रा.बामणी ता.सांगोला, जि.सोलापूर) यांना केली. भुमि रोड एक्युपमेंट या कंपनीचा पिवळ्या रंगाचा 25 लाख 65 हजार रूपये किंमतीचा डांबर हॉटमिक्स प्लॅन्ट त्यामध्ये ड्रायर ड्रम्प विथ ऑल इटस रिलिटेड एक्सेसरिज चोरीला गेले आहेत. फोर बिन फिडर विथ ऑल इटस रिलिटेड एक्सेसरिज, बिटुमेंट टँक अॅण्ड केबिन पेनल विथ ऑल इटस रिलिटेड एक्सेसरिज असे हॉटमिक्स प्लॅन्टचे सर्व पार्टस चोरून त्याची विक्री करण्यात आली आहे. पूर्ण हॉटमिक्स प्लॅन्टच चोरून विक्री करण्याचा हा उद्योग चव्हाट्यावर आल्याने आटपाडीसह सांगोला तालुक्यात खळबळ माजली आहे.