भीतीदायक स्वप्नांमुळे चोरलेली मूर्ती परत
वृत्तसंस्था / प्रयागराज
भीतीदायक स्वप्ने आणि कुटुंबातील व्यक्तींचे गंभीर आजार असे अनुभव आल्याने एका चोराने आपण चोरलेली अष्टधातूंची राधाकृष्णाची मूर्ती परत केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे घडली. ही मूर्ती या चोराने चोरल्यानंतर सात दिवसांनी परत केली. त्याने ती प्रसिद्ध गो-घाट आश्रम मंदिरातून चोरली होती. मूर्ती परत करण्याचे कारण त्याने मूर्तीसह पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले असून हा या भागात चर्चेचा विषय झाला आहे.
या घटनेची माहिती या परिसराचे पोलीस अधिकारी अनिल कुमार मिश्रा यांनी दिली. 23 सप्टेंबरला रात्री गो-घाट आश्रम मंदिरातून अष्टधातूंची राधाकृष्णाची मूर्ती चोरीला गेली आहे, अशी तक्रार या मंदिराचे महंत स्वामी जयरामदास महाराज यांनी सादर केली होती. पोलीसांकडून मूर्तीचा शोध घेतला जात होता.
सात दिवसांनंतर परत
चोरीच्या घटनेनंतर सात दिवसांनी या मंदिराच्या मार्गावर एका व्यक्तीने एक पिशवी ठेवल्याचे आणि नंतर ती व्यक्ती पळून गेल्याचे काही जणांनी पाहिले. त्यांनी त्या व्यक्तीचा पाठलाग केला पण ती व्यक्ती सापडली नाही. पिशवीत स्फोटके असावीत या समजुतीने कोणीही त्या पिशवीच्या जवळ गेले नाही. मात्र, काहीवेळाने बघ्यांपैकी काही जणांनी ही पिशवी उघडून पाहण्याचे धाडस केले. पिशवीत त्यांना राधकृष्णाची मूर्ती सापडली. हीच मूर्ती चोरीला गेली होती.
मूर्तीसमवेत क्षमापत्र
या मूर्तीसह एक क्षमापत्रही आढळून आले. या पत्रात त्या चोराने आपण मूर्ती चोरल्याचे स्पष्ट केले होते. तसेच मूर्ती चोरल्यापासून आपल्याला भयंकर स्वप्ने पडत आहेत आणि आपल्या कुटुंबातील काही व्यक्ती गंभीररित्या आजारी झाल्या आहेत, अशीही माहिती त्याने या पत्रात लिहिली होती. आपल्याला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला असून आपण मूर्ती मंदिराला परत करीत आहोत, असे त्याने पत्रात म्हटले होते. हे पत्र त्याने या मंदिराच्या महंतांना उद्देशून लिहिले होते.
मूर्ती बिघडविल्याचे स्पष्ट
ही मूर्ती विकण्याचा आपला विचार होता. त्यामुळे तिच्या स्वरुप बिघडविण्याचा आपण प्रयत्न केला. पण आता कृतकृत्याचा पश्चात्ताप होत असून मी मूर्ती आपल्या परत करीत आहे, असेही त्याने महंतांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. आता ही मूर्ती आणि तिच्यासह चोरलेल्या काही लहान मूर्ती यांची मूळ स्थानी प्रतिष्ठापना करण्यात आली असून त्यांच्या पूजाआर्चेलाही प्रारंभ करण्यात आला आहे. मात्र, ही चोरी कोणी केली होती, हे अद्यापही गूढच आहे.