झटपट पैसे कमावण्याच्या नादात चोरल्या १८ यामाहा, स्पोर्ट्स बाईक
रेसिंग क्लबच्या नावाखाली दुचाकींची चोरीः १८ चोरीच्या दुचाकी जप्त: करवीर पोलिसांची कारवाई
कोल्हापूर
जनावरांच्या रेसिंग क्लबसाठी यामाहासह स्पोर्टस् बाईकची चोरी करणाऱ्या पाच तरुणांना करवीर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून राजारामपुरी, इस्पुर्ली, शिवाजीनगर, इचलकरंजी, राधानगरीसह सांगली, कर्नाटक, सिंधूदुर्गातून येथून चोरलेल्या ७ लाख रुपयांच्या १८ दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती करवीर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.
संकेत संदीप गायकवाड (वय १९), आदित्य प्रकाश पाटील (२०), सौरभ धनाजी पाटील (२२), यश प्रकाश जाधव (२२) व सुमीत धनाजी माळी (२१, सर्व रा. मौजे सांगाव, ता. कागल) अशी त्यांची नावे आहेत. यामध्ये एका अल्पवयीन संशयितांचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रितेश कोळी (रा. चिंचवाड) हे १८ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त शिवज्योत आणण्यासाठी पह्याळ्यावर निघाले होते. यावेळी त्यांनी आपली दुचाकी केर्ली फाटा येथे लावून चालत पन्हाळा गडावर गेले होते. ज्योत घेऊन परत येताना त्यांना दुचाकी नसल्याचे दिसून आले. त्यांनी याची तक्रार करवीर पोलीस ठाण्यात दिली होती. या गुह्याचा तपास करवीर पोलीस करीत होते. चोरीची ही दुचाकी विकण्यासाठी संकेत गायकवाड हा तरूण मोरेवाडी येथे येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांना मिळाली होती. त्यांनी गुन्हे शोध पथकासह या परिसरात सापळा रचण्याच्या सूचना दिल्या होता. चित्रनगरी परिसरात विनानंबर प्लेट दुचाकींवरून पाच संशयित आल्याचे पथकास दिसून आले. त्यांनी या पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे दुचाकींबाबत कागदपत्रांची मागणी केली. यावेळी या पाचजणांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे पोलिसांना या पाच जणांचा संशय आला. या पाच जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या पाच जणांनी कोल्हापूरसह, सिंधूदुर्ग, सांगली, कर्नाटकातून १८ दुचाकी चोरल्याची कबूली दिली.
यामाहा, स्पोर्ट्स बाईकवर डल्ला
संशयित पाच जण कसबा सांगाव येथे घोडा, श्वान यांच्या शर्यतीचा रेसिंग क्लब चालवित होते. त्याचा एक व्हॉट्स अॅपवर ग्रुप होता. यामाध्यमातून ते शर्यतीचे आयोजन करत होते. शर्यतीसाठी यामाहा आरएक्स १०० या दुचाकींना मोठी मागणी असल्याचे त्यांना माहिती होते. यातूनच त्यांना वाहने चोरण्याची कल्पना सुचली. शर्यतीचे शौकीन अशी वाहने खरेदी करण्यासाठी लाखाची किंमत मोजत होते.
२० ते २२ वयोगटातील तरुण
दुचाकी चोरीच्या गुह्यात अटक करण्यात आलेले चार जण २० ते २२ वयोगटातील आहेत. तर एक जण अल्पवयीन आहे. हे चारही जण सर्वसामान्य कुटूंबातील असून, झटपट पैसे कमावण्याच्या नादात त्यांनी चोरीचे गुन्हे केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.