For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साखरेचा साठा करताय... सावधान!

06:22 AM Aug 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
साखरेचा साठा करताय    सावधान
Advertisement

केंद्र सरकारकडून कठोर नियम लागू : 1 सप्टेंबरपासून घेणार साठेबाजांचा शोध

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

साखरेचा दर किरकोळ बाजारपेठेत 70 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून साखरेच्या साठ्यासंदर्भात कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. यापुढे घाऊक व्यापारी आणि साठा करणाऱ्यांना दहा टनापेक्षा जास्त साखर पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ स्वत:कडे ठेवता येणार नाही. त्यामुळे हा नियम 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. सदर अध्यादेशाची प्रत बेळगाव जिल्हा अन्न व नागरी पुरवठा खात्याला प्राप्त झाली असून साठेबाजांवर 1 सप्टेंबरपासून कारवाई केली जाणार आहे.

Advertisement

साखर उत्पादनात ब्राझील हा देश जगात प्रथम क्रमांकावर आहे. तर भारत दुसऱ्या क्रमांकाचा प्रमुख साखर उत्पादक देश आहे. भारतातून परदेशात साखरेची निर्यात केली जाते. मात्र अचानक देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचे दर गगनाला भिडले आहेत. साखरेचे दर वाढल्याने केंद्र सरकारने साठेबाजी संबंधीचे नियम अधिक कठोर केले आहेत. कच्चा माल म्हणून साखरेचा वापर करण्यासह इतर सर्व कामांसाठी घाऊक व्यापारी आणि साठा करणाऱ्यांना दहा टनांपेक्षा जास्त साखर पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ स्वत:कडे ठेवता येणार नाही. यापूर्वी ही मर्यादा एक महिना इतकी होती.

साखर साठ्याच्या बाबतचा निर्णय 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीसाठी लागू असणार आहे. ऐन सणासुदीच्या काळातच साखरेचा दर वाढल्याने साखरेचा गोडवा कमी झाला आहे. आगामी सणासुदीच्या काळात ग्राहकांना माफक दरात साखर उपलब्ध व्हावी या उद्देशाने सदर निर्णय घेण्यात आला असून साखरेची मोठ्या प्रमाणात आयात करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. घाऊक बाजारपेठेत साखर प्रती किलो 66 रुपये तर किरकोळ बाजारपेठेत 70 रुपये किलो प्रमाणे विक्री केली जात आहे.

सणाच्या तोंडावरच दरात मोठी वाढ

साखरेबरोबरच गुळाचे दरही वाढले आहेत. सध्या घाऊक बाजारपेठेत गूळ 68 रुपये प्रती किलो तर किरकोळ बाजारपेठेत 71 रुपये किलो प्रमाणे विक्री केला जात आहे. गणेशोत्सवानंतर दसरा, दीपावली हे मोठे सण येणार आहेत. मात्र सणाच्या तोंडावरच साखर आणि गुळाच्या दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे.

1 सप्टेंबरपासून साठेबाजांचा शोध

देशांतर्गत साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याने 15 दिवसांपेक्षा अधिक काळ दहा टनांहून अधिक साखरेचा साठा करता येत नाही. सदर आदेशाची प्रत केंद्र सरकारकडून प्राप्त झाली आहे. त्यानुसार 1 सप्टेंबरपासून साठेबाजांचा शोध घेऊन कारवाई केली जाईल.

- मल्लिकार्जुन नाईक, उपसंचालक अन्न व नागरी पुरवठा खाते

Advertisement
Tags :

.