आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात तेजीचा चौकार
सेन्सेक्स 521 तर निफ्टी 159 अंकांनी तेजीत, ऑटो, एनर्जी समभागांची खरेदी
वृत्तसंस्था, मुंबई
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअरबाजारात तेजीचा कल कायम राहिलेला दिसला. बँक तसेच ऑटो निर्देशांकाची मजबूत कामगिरी बाजाराला सहाय्यक ठरली. मेटल व रियल्टी समभागांमध्येदेखील सोमवारी खरेदी पाहायला मिळाली.
सोमवारी शेअरबाजाराचे सत्र थांबले तेव्हा मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 521 अंकांनी वाढत 78285 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 150 अंकांनी वाढत 24430 अंकांवर बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांक 353 अंकांच्या तेजीसोबत 58291 च्या स्तरावर बंद होताना दिसला. आयटी निर्देशांक मात्र 162अंकांनी घसरत 27276 च्या स्तरावर बंद झाला. सकाळपासून बाजारात तेजी होती ती शेवटपर्यंत कायम टिकली हे विशेष.
क्षेत्रांच्या निर्देशांकांची कामगिरी
आयटी वगळता इतर सर्व क्षेत्रांची कामगिरी तेजीसोबत दिसून आली. ऑटो निर्देशांक 365 अंकांनी मजबूत होत 27352 अंकांवर बंद झाला होता. एनर्जी निर्देशांक 302 अंकांनी तेजीसह 39481 अंकांवर बंद झाला. कमोडिटीज, सीपीएसई, इन्फ्रा, फार्मा, रियल्टी, मेटल, फायनॅन्शीयल्स, एफएमसीजी, ऑईल व गॅस यांचे निर्देशांक वधारत बंद झाले.
समभागांची कामगिरी
एचडीएफसी बँक, हिंडाल्को, बजाज ऑटो, ओएनजीसी, महिंद्रा आणि महिंद्रा, बीईएल यांचे समभाग सर्वाधिक तेजीत राहिले. तर कोटक महिंद्रा बँक, मॅक्स हेल्थकेअर, टीसीएस, कोल इंडिया, बजाज फिनसर्व्ह, विप्रो यांचे समभाग सर्वाधिक निफ्टीत घसरणीत होते. आयशर मोटर्स, रिलायन्स, जेएसडब्ल्यू स्टील, ग्रासिम, सिप्ला, नेस्ले, सनफार्मा, जियो फायनान्स, एशियन पेंटस्, टायटन, ट्रेंट, टाटा मोटर्स पीव्ही, मारुती सुझुकी, भारती एअरटेल यांचे समभागही तेजीत होते. घसरणीत एसबीआय, इन्फोसिस, एनटीपीसी, इंडिगो, अपोलो हॉस्पिटल, अल्ट्राटेक सिमेंट, डॉ. रे•िज लॅब्ज, एचडीएफसी लाइफ, पॉवरग्रिड कॉर्प, अदानी एंटरप्रायझेस यांचे समभाग होते.
जागतिक बाजारात आशियात घसरण होती. दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.46 टक्के इतका नुकसानीत होता. तर जपानच्या निक्केई 0.01 टक्के इतका घसरला होता. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक 1.14 टक्के इतका तेजीत होता.