आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअरबाजार 455 अंकांनी तेजीत
आयटी, ऑटो कंपन्या चमकल्या : निफ्टी 148 अंकांनी वधारला
वृत्तसंस्था/ मुंबई
आयटी आणि ऑटो कंपन्यांच्या समभागांच्या खरेदीमुळे सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजी अनुभवायला मिळाली. सेन्सेक्स 455 अंकांनी वाढत बंद झाला.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 455 अंकांच्या वाढीसह 82176 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 148 अंकांच्या वाढीसोबत 25001 अंकांवर बंद झाला होता. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 22 समभाग तेजीसोबत बंद झाले तर उर्वरीत 8 समभागांमध्ये घसरण दिसली. महिंद्रा, एचसीएल टेक, टाटा मोटर्स यांच्यासह 9 समभाग 2.17 टक्के वाढत बंद झाले. इटर्नल म्हणजेच झोमॅटोचे समभाग मात्र 4.55 टक्के घसरणीत होते. निफ्टी निर्देशांकातील समभागांची कामगिरी पाहता 50 पैकी 38 समभाग हे नफ्यासोबत बंद झाले. तर दुसरीकडे 12 कंपन्यांचे समभाग घसरलेले दिसले. सर्व क्षेत्रांचे निर्देशांक तेजी राखत बंद झाले पण यातही ऑटो निर्देशांकाने 1.05 टक्के वाढीसह चमक राखली होती. याला सहाय्य करत मेटल निर्देशांकाने 0.94 टक्के, आयटी 1.02 टक्के व रियल्टी निर्देशांक 0.76 टक्के वाढ दर्शवली होती.
जागतिक बाजारात अमेरिकेत घसरण
आशियाई बाजारात पाहता जपानचा निक्केई 371 अंकांनी वधारत 37,531 वर पोहचला होता तर कोरियाचा कोस्पी 52 अंकांच्या तेजीसोबत 2644 वर बंद झाला. हाँगकाँगचा हँगसेंग मात्र 319 अंकांनी घसरणीत होता. चीनचा शांघाय कम्पोझीट अल्पशा घसरणीसोबत कार्यरत होता. अमेरिकेतील डोव्ह जोन्स 23 मे रोजी 256 अंकांनी घसरणीत, नॅसडॅक कम्पोझीट 188 अंकांनी आणि एस अँड पी500 ही 39 अंकांनी घसरणीत होता.
दुसरीकडे विदेशी गुंतवणूकदारांनी 23 मे रोजी 1794 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले होते. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 299 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले होते. मेमध्ये आतापर्यंत पाहता विदेशी गुंतवणूकदारांनी कॅश सेगमेंटमध्ये 12191 कोटींचे आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 34,497 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले आहेत.