सुरुवातीच्या मोठ्या घसरणीतून शेअर बाजार सावरत बंद
सेन्सेक्स-निफ्टी सपाट स्तरावर बंद, आयटी निर्देशांक मोठ्या तेजीसोबत बंद
वृत्तसंस्था, मुंबई
इराण अमेरिका यांच्यातील तणावाच्या वातावरणात तसेच व्रुड तेलाच्या दरात झालेली वाढ या पार्श्वभूमीवर सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात घसरलेला बाजार अखेर सावरत सपाट स्तरावर बंद झाला. आयटी निर्देशांकाने हजार अंकांच्या वाढीसह बाजाराला मजबूत आधार देण्याचे काम केले.
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 47 अंकांनी वाढत 77616 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक नाममात्र 4 अंक वाढत 24211 अंकांवर बंद झाला होता. बँक निफ्टी निर्देशांक 85 अंकांच्या तेजीसोबत 58131 अंकांवर बंद झाला. तर सर्वाधिक दमदार कामगिरी नोंदवली ती आयटी निर्देशांकाने. 1005 अंकांच्या वाढीसोबत आयटी निर्देशांक 29015 अंकांवर बंद होताना दिसला. मिडकॅप व स्मॉलकॅप यांचे निर्देशांकही सपाट स्तरावर वाढत बंद झाले.
विविध क्षेत्रांची कामगिरी
विविध क्षेत्रांच्या कामगिरीवर नजर टाकली असता ऑटो, आयटी, फायनॅन्शीयल्स, सीपीएसई यांचे निर्देशांक वाढत बंद झाले. दुसरीकडे कमोडिटीज, एनर्जी, एफएमसीजी, इन्फ्रा, मेटल, ऑईल व गॅस, फार्मा व रियल्टी यांचे निर्देशांक कमकुवत होत बंद झाले. यात एफएमसीजी निर्देशांक 500 अंकांच्या घसरणीसमवेत 48809 च्या स्तरावर बंद झाला होता.
हे समभाग वधारले
विविध समभागांची कामगिरी पाहता निफ्टीत टीसीएस, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, इन्फोसिस, बजाज ऑटो व एनटीपीसी यांचा मजबूतीसोबत दबदबा पाहायला मिळाला. टीसीएसचा समभाग 5.44 टक्के म्हणजे 112 रुपयांनी वधारत 2181 रुपयांवर व्यवहार करत होता. कोटक महिंद्रा, विप्रो, ओएनजीसी, टाटा मोटर्स पीव्ही, पॉवरग्रिड कॉर्प, एचडीएफसी लाइफ, अदानी एंटरप्रायझेस, महिंद्रा आणि महिंद्रा, कोल इंडिया, टायटन, श्रीराम फायनान्स, आयसीआयसीआय बँक यांचेही समभाग वधारत बंद झाले.
हे समभाग घसरले
आघाडीवर घसरणीत निफ्टीत ग्रासिम, टाटा स्टील, नेस्ले इंडिया, इंडिगो, इटर्नल व टाटा कंझ्युमर्स यांचा समावेश होता. याखेरीज आयटीसी, डॉ. रे•िज लॅब्ज, लार्सन टुब्रो, सिप्ला, जेएसडब्ल्यू स्टील, अपोलो हॉस्पिटल, सनफार्मा, रिलायन्स, अदानी पोर्टस, भारती एअरटेल, बीईएल, मारुती सुझुकी, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, जियो फायनान्स, मॅक्स हेल्थकेअर, एशियन पेंटस् यांचे समभाग नकारात्मक कामगिरी करत बंद झाले होते.