For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेअर बाजारात परतली तेजी, रियल्टी निर्देशांकाचा सहारा

06:44 AM Apr 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
शेअर बाजारात परतली तेजी  रियल्टी निर्देशांकाचा सहारा
Advertisement

सेन्सेक्स 592 अंकांनी तेजीत : विविध निर्देशांक तेजीत

Advertisement

मुंबई :

जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणात भारतीय शेअर बाजार बुधवारी तेजीसमवेत बंद झाला. रियल्टी आणि कंझ्युमर ड्युरेबल निर्देशांक तेजी दाखवत बंद झाले. बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 592 अंकांनी वाढत 76617 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 166 अंकांनी वधारत 23332 अंकांवर बंद झाला. रियल्टी निर्देशांक सर्वाधिक 3.61 टक्के तर कंझ्युमर ड्युरेबल निर्देशांक 2.51 टक्के वाढत बंद झाले होते. या सोबत आयटी, एफएमसीजी, धातू आणि फार्मा निर्देशांकांनीही वधारत बाजाराला चांगला आधार दिला.

Advertisement

समभागांची कामगिरी

समभागांचा विचार करता झोमॅटोचे समभाग सर्वाधिक वाढलेले होते. जवळपास 5 टक्क्यांची तेजी समाभागाने प्राप्त केली होती. या सोबत टायटन, इंडसइंड बँक, मारुती सुझुकी आणि टेक महिंद्रा यांचे समभागसुद्धा मजबुत होत बंद झाले. दुसरीकडे नेस्ले इंडियाचे समभाग सर्वाधिक नुकसानीत पहायला मिळाले. अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, पॉवरग्रीड कॉर्प, बजाज फिनसर्व्ह, लार्सन टुब्रो, एशियन पेंट्स आणि एनटीपीसी यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहे. सेंसेक्समधील 30 कंपन्यांपैकी 21 समभाग तेजी समवेत तर 9 समभाग घसरणीसोबत बंद झाले.

जागतिक बाजाराचा विचार करता जपानचा निक्केई निर्देशांक 0.28 टक्के आणि चीनचा शांघाई कंपोझीट निर्देशांक 0.05 टक्के तेजी राखत व्यवहार राखत होते. एस अॅण्ड पी 500 निर्देशांक 0.38 टक्के वाढत बंद झाला. 1 एप्रिल रोजी अमेरिकेतील डो जोन्स 0.028 टक्के घसरत बंद झाला. तर नॅसडॅक कंपनी 0.87 इतकी तेजीत राखत व्यवहार करत होता. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप हे बुधवारी उशीरा रात्री कराची घोषणा करणार आहेत. या घोषणेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पावित्रा घेतला आहे. भितीपोटी शेअरबाजार मंगळवारी 1390 अंकांनी कोसळला होता. मात्र बुधवारी कर आकारणीचा दबाव बाजारात कमी झालेला पहायला मिळाला.

Advertisement
Tags :

.