सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार तेजीत
सेन्सेक्स 291 अंकांनी वधारला, फार्मा, आयटी समभागांची खरेदी, कच्चे तेल स्थिर
वृत्तसंस्था मुंबई
आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी भारतीय शेअर बाजारामध्ये तेजीचा माहोल कायम राहिला होता. फार्मा आणि आयटी निर्देशांकांच्या तसेच जागतिक सकारात्मक वातावरणाचा फायदा शेअर बाजाराला झाला.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 291 अंकांनी वाढत 77094 अंकांवर बंद झाला. 50 समभागांचा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 89 अंकांनी वाढत 24102 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांकदेखील 249 अंकांच्या वधारासह 57935 च्या स्तरावर बंद होताना दिसला. निफ्टी मिडकॅप-50 निर्देशांक 65 अंकांनी वाढत बंद झाला तर निफ्टी स्मॉलकॅप-100 निर्देशांक 112 अंकांनी वाढीसोबत बंद झाला होता.
विविध समभागांची कामगिरी
समभागांची कामगिरी पाहिल्यास टेक महिंद्रा, सिप्ला, डॉ. रे•ाrज लॅब्ज, बजाज ऑटो, ग्रासिम, हिंडाल्को, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, बीईएल, बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग सर्वाधिक तेजीत पहायला मिळाले. दुसरीकडे एशियन पेंटस्, टायटन, ट्रेंट, आयटीसी, पॉवरग्रीड कॉर्प, इटर्नल, श्रीराम फायनान्स, नेस्ले, कोल इंडिया, जिओ फायनान्स, ओएनजीसी, विप्रो, अपोलो हॉस्पिटल, जेएसडब्ल्यू स्टील यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले. मिडकॅपमध्ये सेल, येसबँक, कमिन्स, पेज इंडस्ट्रीज, डिक्सन टेक्नॉलॉजी आणि एचडीएफसी एएमसी यांचा घसरणीत समावेश होता.
विविध क्षेत्रांची कामगिरी
12 क्षेत्रापैकी फक्त एकच क्षेत्र नुकसानीसह बंद झाले होते. निफ्टी एफएमसीजी निर्देशांक 203 अंकांनी घसरत 49355 अंकांवर बंद झाला. इतर निर्देशांकामध्ये ऑटो, कमोडिटीज, सीपीएसई, एनर्जी, फायनान्सीयल्स, इन्फ्रा, आयटी, मेटल, ऑईल व गॅस, फार्मा व रियल्टी यांचे निर्देशांक मजबूत होत बंद झाले. यामध्ये फार्मा निर्देशांक सर्वाधिक 302 अंकांनी वाढीसोबत 24762 अंकांवर बंद होताना दिसला.
जागतिक बाजारामध्ये पाहता आशियाई बाजारात मिळताजुळता कल होता. दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.69 टक्के वाढत बंद झाला. जपानचा निक्केईदेखील 1.55 टक्के तेजीत पहायला मिळाला. मात्र हाँगकाँगचा हँगसेंग 0.65 टक्के घसरणीत होता. शुक्रवारी अमेरिकेतील बाजार बंद होते.