स्वस्त कच्चे तेल, रिलायन्स यांच्यामुळे शेअर बाजारात तेजी
सेन्सेक्स 1233 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांच्या खात्यात 8 लाख कोटींची भर
वृत्तसंस्था, मुंबई
भारतीय शेअर बाजाराचा सोमवारचा दिवस हा दमदार तेजीचा राहिला. सेन्सेक्स 1233 अंकांनी तर निफ्टी 387 अंकांनी वाढत बंद होताना दिसला. बँक निर्देशांकसुद्धा सोमवारी तेजीत होता. कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली घसरण बाजाराला आधार देणारी ठरली. रिलायन्सचा समभाग सर्वाधिक तेजीत राहिला होता.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 1233 अंकांनी वाढत 75692 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 387 अंकांनी वाढत 23440 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक 315 अंकांनी वाढत 55002 अंकांवर बंद झाला. याच दरम्यान शेअर बाजारातील सुचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य सोमवारी जवळपास 8 लाख कोटींनी वाढल्याचे पहायला मिळाले.
बाजाराला तेजी देण्यामध्ये बाजार भांडवल मूल्यामध्ये आघाडीवर असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा वाटा सर्वाधिक दिसून आला. रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग सोमवारच्या सत्रात चांगल्या तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर 11 टक्के इतका वाढलेला दिसला. याच दरम्यान एनर्जी निर्देशांक 3.9 टक्के इतका वधारला होता. रिलायन्सचा समभाग एप्रिल 2020 नंतर एकाच दिवसांत सर्वाधिक प्रमाणात तेजीत असलेला पहायला मिळाला. निफ्टीमध्ये रिलायन्सनंतर टाटा स्टीलचा समभाग सर्वाधिक वधारला होता. यासोबत इन्फोसिस आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग मात्र कमकुवत होत बंद झाले. विविध क्षेत्रांची कामगिरी पाहता ऑईल अॅण्ड गॅस मेटल आणि पीएसयु बँक यांचे निर्देशांक तेजीत राहिले होते. आयटी आणि मीडिया क्षेत्रातील निर्देशांक मात्र दबावात होते. मोठ्या कंपन्यांसोबत स्मॉल व मिड कॅप कंपन्या तेजी राखू शकल्या होत्या. निफ्टी मिडकॅप-100 निर्देशांक 1.19 टक्के तर निफ्टी स्मॉल कॅप-100 निर्देशांक 0.71 टक्के वाढत बंद झाला. निफ्टीत 500 पैकी 391 समभाग तेजीसोबत बंद झाले तर 105 समभाग घसरणीत राहिले होते. बाजारामध्ये बीएसईवरील सुचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 482.41 लाख कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचले होते. म्हणजेच एकाच दिवसांत 8 लाख कोटी रुपये वाढलेले पहायला मिळाले.
