टॅरिफच्या दबावात शेअरबाजारात मोठी घसरण
सेन्सेक्समध्ये 1390 अंकांची पडझड, आयटी निर्देशांक दबावात
मुंबई :
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प बुधवार 2 एप्रिलपासून शुल्क आकारणी करणार असून या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार मंगळवारी मोठ्या दबावाखाली असताना दिसला. सेन्सेक्स 1390 अंकांनी तर निफ्टी 353 अंकांनी घसरणीत राहिला. आयटी आणि रियल्टी क्षेत्रातील समभाग मोठ्या घसरणीत होते.
मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 1390 अंकांनी कोसळून 76024 च्या स्तरावर बंद झाला असून दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 353 अंकांनी घसरुन 23165 अंकांवर बंद झाला. सकाळी सेन्सेक्स 500 अंकांपेक्षा अधिक घसरत 76882 च्या स्तरावर खुला झाला. दुसरीकडे निफ्टी निर्देशांक घसरणीसह सुरू झाला होता. 11.15 वाजता निफ्टी निर्देशांक 278 अंकांनी घसरून 23240 च्या स्तरावर कार्यरत होता.
विविध समभागांच्या कामगिरीचा विचार करता सेन्सेक्समधील 30 पैकी 27 कंपन्यांचे समभाग नुकसानीत दिसून आले. यामध्ये सर्वाधिक बजाज फिनसर्व्हचे समभाग कोसळलेला पाहायला मिळाला. याखेरीज इन्फोसिस, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक यांचे समभागही दबावाखाली घसरत व्यवहार करत होते. इंडसइंड बँक यांचे समभाग जवळपास 5टक्के घसरत व्यवहार करत होते. झोमॅटो, नेस्ले इंडिया, आयटीसी, भारती एअरटेल आणि पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग मात्र काहीसे तेजी सोबत कार्यरत होते. दिग्गज एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या समभागांनी निर्देशांकाला खाली खेचण्यासाठी हातभार लावला होता.
2 एप्रिल रोजी डोनाल्ड ट्रम्प विविध देशांसाठी शूल्क आकारण्याची घोषणा करणार असून या भीतीमुळेच मंगळवारी शेअर बाजारामध्ये गुंतवणूकदार काहीसे दबावाखाली होते. गुंतवणूकदारांनी विक्रीवर भर दिल्याने शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. भारताच्या बाबतीमध्ये ट्रम्प शुल्क आकारणीबाबत कोणती भूमिका घेतात याकडे तमाम गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे. याच दरम्यान ट्रम्प यांनी शुल्क आकारणीबाबत कोणत्याही देशाला सवलत दिली जाणार नसल्याचे वक्तव्य केल्याने त्याने भारतीय बाजारात नकारात्मक कल निर्माण झाला होता.