शेअरबाजाराची नव्या विक्रमाला गवसणी
सेन्सेक्समध्ये 847 अंकांची उसळी, आयटी कंपन्या तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअरबाजाराने दमदार तेजीसह नव्या सर्वकालीन उच्चांकी स्तर गाठण्यात यश मिळविले आहे. इन्फोसिस आणि टीसीएस या कंपन्यांच्या उत्साही निकालाचा परिणाम बाजारावर दिसून आला. जागतिक बाजारामध्ये शुक्रवारी सकारात्मक वातावरण राहिल्याने त्याचाही परिणाम भारतीय बाजारावर पाहायला मिळाला. सेन्सेक्स 847 अंकांनी आणि निफ्टी 247 अंकांनी वधारत बंद झाला.
शुक्रवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 847 अंकांच्या दमदार तेजीसह 72568 अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 247 अंकांच्या तेजीसमवेत 21894 अंकांवर बंद झालेला पाहायला मिळाला. शुक्रवारी शेअरबाजाराने सर्वकालीन उच्चांकी स्तर गाठण्यामध्ये यश मिळविले होते. शुक्रवारच्या सत्रात एकावेळी सेन्सेक्स निर्देशांकाने 72,720 अंकांची सर्वोच्च पातळी गाठली तर निफ्टीनेदेखील 21,928 अंकांची सर्वोच्च पातळी गाठली. आयटी आणि सरकारी बँकाचे समभाग मोठ्या प्रमाणामध्ये शुक्रवारी खरेदी करण्यात आले. निफ्टी आयटी निर्देशांक 5.14 टक्के इतक्या वाढीसह बंद झाला होता. तिसऱ्या तिमाहीतील निकालानंतर इन्फोसिसचे समभाग 8 टक्के वाढीसह (120 रुपये) 1615 रुपयांवर बंद झाले होते. टीसीएसचे समभाग 3.92 टक्के वाढीसह 3882 रुपयांवर बंद झाले. या खेरीज कोफोर्ज 5.71 टक्के, एचसीएल टेक्नॉलॉजीस 4.65 टक्के, विप्रो 3.97 टक्के, एलटीआय माइंट्रीचे समभाग 4.63 टक्के तेजीसह बंद झाले होते. शेअर बाजारात सिप्ला, अपोलो हॉस्पिटल, बजाज फिनसर्व्ह आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले. एचडीएफसी लाईफ कंपनीचा तिमाही निकाल जाहीर झाला असून नफा 367 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. निफ्टी मिडकॅप 100 व बीएसई स्मॉलकॅप निर्देशांकदेखील दमदार तेजीसह बंद झाले.