सलग चौथ्या सत्रात शेअरबाजारात तेजीचा सूर
सेन्सेक्स 347 अंकांनी चमकत बंद, एनर्जी निर्देशांकाची शानदार कामगिरी, कच्चे तेल घसरले
बुधवारी चौथ्या सत्रात भारतीय शेअरबाजारात तेजीचा सूर कायम राहिल्याचे दिसून आले. सेन्सेक्स 347 अंकांनी वाढत बंद झाला. मेटल, सरकारी बँक व कंझ्युमर ड्युरेबल्स कंपन्यांच्या समभागांनी तेजी राखत बाजाराला आधार दिला.
वृत्तसंस्था, मुंबई
बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स 347 अंकांच्या वधारासोबत 77155 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 96 अंकांच्या वाढीसोबत 24085 अंकांवर बंद झाला. निफ्टीला 24 हजारची पातळी ओलांडून बंद होण्यात बुधवारी फार काळानंतर यश मिळालं आहे. मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांकही काहीशा तेजीसोबत बंद झाले. निफ्टी बँक निर्देशांक 287 अंकांनी वाढत 57585 च्या स्तरावर बंद झाला होता.
हे समभाग वधारले
शेअरबाजारात चौथ्या दिवशीही तेजीचा माहोल दिसून आला. यात ट्रेंट, बीईएल, हिंडाल्को, इटर्नल, टाटा स्टील, एसबीआय लाइफ यांच्यासह एचडीएफसी लाइफ, इन्फोसिस, भारती एअरटेल, नेस्ले, एसबीआय, टायटन, विप्रो, इंडिगो, एचसीएल टेक, लार्सन टुब्रो, अपोलो हॉस्पिटल, जियो फायनॅन्शीयल, एनटीपीसी, मॅक्स हेल्थकेअर, एचडीएफसी बँक, पॉवरग्रिड कॉर्प, अदानी एंटरप्रायझेस, ग्रासिम, सनफार्मा, आयडीबीआय बँक, भारत डायनॅमीक्स, यस बँक, डिक्सन टेक्नॉलॉजी, कोचिन शिपयार्ड, आयओबी यांचे समभाग तेजीसमवेत बंद होताना दिसले.
हे समभाग घसरले
दुसरीकडे घसरणीमध्ये पाहता बजाज फिनसर्व्ह, अॅक्सिस बँक, महिंद्रा आणि महिंद्रा, एशियन पेंटस्, मारुती सुझुकी, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा कंझ्युमर, एचयुएल, आयशर मोटर्स, आयटीसी, ओएनजीसी, सिप्ला, टाटा मोटर्स पीव्ही, डॉ. रे•िज लॅब्ज, बीएसई लिमिटेड, फॅक्ट, कोलगेट, एमआरपीएल, पतंजली फुडस्, पीआय इंडस्ट्रिज यांचे समभाग होते.
एनर्जीचा निर्देशांक सर्वाधिक वधारला
विविध क्षेत्रांच्या निर्देशांकांची कामगिरी पाहता 5 निर्देशांक मात्र नुकसानीसह बंद झाले तर 7 निर्देशांकांनी तेजी राखली होती. तेजीत पाहता कमोडिटीज, सीपीएसइ, एनर्जी, इन्फ्रा, आयटी, मेटल, ऑईल व गॅस यांचा समावेश होता. यातही एनर्जी निर्देशांक 323 अंकांनी वधारत 40238 अंकांवर बंद झाला. आयटी निर्देशांक 241 अंकांच्या वाढीसोबत 28809 अंकांवर बंद झाला. ऑटो निर्देशांक सर्वाधिक प्रभावीत झालेला होता, जो सरतेशेवटी 167 अंकांच्या घसरणीसोबत 26724 अंकांवर बंद झाला.