विक्रीच्या दबावात शेअर बाजारात घसरण
सेन्सेक्स 384 अंकांनी घसरला : आयटी, धातू कंपन्या दबावात
मुंबई
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजार दबावाखाली कार्यरत राहिला होता. सेन्सेक्स 384 अंकांच्या घसरणीसोबत बंद झाला तर धातू आणि आयटी निर्देशांकांनी निराशादायक कामगिरी केली.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 384 अंकांनी घसरत 81,748 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांकही 100 अंकांनी घसरत 24,668 अंकांवर बंद झाला होता. शेअरबाजारात सोमवारी दिवसभरात विक्रीचा दबाव पाहायला मिळाला. इंडसइंड बँकेचे समभाग 1 टक्के वाढले तर टायटनचे समभाग मात्र 2 टक्के घसरणीत राहिले होते. सकाळी 12 वाजेपर्यंतच्या सत्रात बाजारात चांगलीच घसरण दिसून आली होती, पण नंतर काही अंशी बाजार सावरला. शुक्रवारी मात्र दोन्ही निर्देशांक चांगल्या तेजीसोबत बंद झाले होते.
हे समभाग तेजीत
बाजारात इंडसइंड बँकेचे समभाग सर्वाधिक 1.29 टक्के वाढत 999 च्या स्तरावर बंद झाले होते. यासोबत बजाज फायनान्सचे समभाग 0.36 टक्के वाढीसह 7208 रुपयांवर व पॉवरग्रिडचे समभाग 0.35 टक्के तेजीसह 335 रुपयांच्या स्तरावर बंद झाले. अॅक्सिस बँकेचे समभाग 0.24 टक्के मजबुत होत 1151 रुपयांवर बंद झाले आणि महिंद्रा आणि महिंद्राचे समभाग 0.12 टक्के वाढत 3085 च्या स्तरावर बंद झाले. यासोबत मारुती सुझुकी, आयटीसी, ट्रेंट, अपोलो हॉस्पिटल, सिप्ला, आयशर मोटर्स, कोल इंडिया यांचेही समभाग सकारात्मक स्थितीत बंद झाले.
हे समभाग घसरले
घसरणीचा विचार केल्यास टायटनचे समभाग सर्वाधिक घसरलेले होते. 2.2 टक्के घसरत 3438 रुपयांवर समभाग बंद झाले. यासोबत अदानी पोर्टस् 1.34 टक्के घसरत 1243 रुपयांवर, टीसीएसचे समभाग 1.32 टक्के घसरणीसोबत 4415 रुपयांवर राहिले होते. एनटीपीसीचे समभाग 1.19 टक्के नुकसानीसह 352 च्या स्तरावर बंद झाले. यासोबत ब्रिटानिया, नेस्ले इंडिया, जेएसडब्ल्यू स्टील, ओएनजीसी, टाटा मोटर्स, बीपीसीएल, टाटा स्टील, इन्फोसिस, टेक महिंद्रा, ग्रासिम, सनफार्मा, एशियन पेंटस्, विप्रो, रिलायन्स, हिंडाल्को, एसबीआय लाइफ इन्शुरन्स यांचे समभागही नुकसानीसह बंद झाले.
आयटी, मेटल निर्देशांक दबावात
विविध क्षेत्रांच्या निर्देशांकांची कामगिरी पाहिल्यास पीएसयु बँक निर्देशांक 0.51 टक्के मजबूत होत 7057 च्या स्तरावर तर निफ्टी ऑटो 0.07 टक्के वाढत 23,791 च्या स्तरावर बंद झाला. आयटी निर्देशांक 0.74 टक्के घसरत 45,654 वर तर मेटल निर्देशांक 0.97 टक्के घसरत 9348 अंकांवर बंद झाला.