बुधवारी शेअर बाजारात घसरण
सेन्सेक्स 183 अंकांनी घसरणीत, मिडकॅप घसरणीत तर स्मॉल कॅप तेजीत, आयटी समभागांमध्ये दबाव
कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट शेअर बाजाराला सुरुवातीच्या सत्रामध्ये तेजी राखण्यासाठी सहाय्यक ठरली. मात्र अखेरच्याक्षणी शेअर बाजार काहीसा घसरणीसोबत बंद झाला. आयटी समभाग मोठ्या प्रमाणामध्ये दबावात असल्याचे पहायला मिळाले. स्मॉल कॅप निर्देशांक तेजीसोबत कार्यरत होता.
त. भा. वृत्तसंस्था
मुंबई : बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 183 अंकांनी घसरत 77472 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 127 अंकांनी घसरत 24207च्या स्तरावर बंद होताना दिसला. मिडकॅप निर्देशांक 32 अंकांनी घसरत 18381 वर बंद झाला तर मिडकॅप 50 निर्देशांक 62 अंकांनी वाढत 10012 अंकांवर बंद झाला.
सुरुवातीच्या सत्रामध्ये सेन्सेक्स जवळपास 240 अंकांनी वाढलेला होता. तर निफ्टीदेखील 24300 च्या स्तरावर कार्यरत असताना दिसला. याच दरम्यान आयटी समभागांनी बाजारावर दबाव निर्माण केला आणि अखेर बाजाराला काहीशा नुकसानीसोबत बंद होणे भाग पडले. आयटी निर्देशांक 1.5 टक्के इतका सर्वाधिक घसरणीत होता. निफ्टी निर्देशांकात 50 पैकी 36 समभाग कमकुवत होत बंद झाले. यामध्ये पाहता आयटी कंपनी, इन्फोसिस दूर संचार क्षेत्रातील कंपनी, भारती एअरटेल तसेच पॉवरग्रीड कॉर्प यांचे समभाग जवळपास 2टक्के इतके घसरणीत होते. दुसरीकडे पाहता कोटक बँकेचा समभाग 3.76 टक्के इतक्या तेजीसोबत निर्देशांकामध्ये अग्रस्थानावर राहिला.
बीएसईवर पाहता 4540 समभागांमध्ये बुधवारी व्यवहार झाला. ज्यामध्ये 2385 समभाग तेजीसमवेत आणि 1933 समभाग घसरणीसोबत बंद झाले. याच दरम्यान 156 समभागांनी 1 वर्षाच्या उच्चांकावर आणि 90 समभागांनी वर्षाच्या नीचांकी स्तरावर पोहोचण्याचे कार्य केले. 209 समभागांना अप्पर सर्किट लागले.
समभागांची कामगिरी
अॅक्सिस बँकेचा समभाग 1.62टक्के, जेएसडब्ल्यू स्टीलचा समभाग 1.57 टक्के, अल्ट्राटेक सिमेंटचा समभाग 1.54 टक्के वाढत बंद झाला. दुसरीकडे एअरटेलचा समभाग 2.31 टक्के, पावर ग्रीड 2.15 टक्के, इन्फोसिस 2.10 टक्के लार्सन टूब्रो 1.97 टक्के आणि नेस्लेचा समभाग 1.86 टक्के कमकुवत होत बंद झाला.