शुक्रवारी नफावसुलीने शेअरबाजार घसरणीत
जागतिक बाजारात नकारात्मक कल : बँकिंग समभाग घसरले
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअरबाजारात शुक्रवारी आठवड्याच्या अखेरच्या दिवशी घसरण अनुभवायला मिळाली. जागतिक बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय शेअरबाजारावर दिसून आला. सेन्सेक्स 400 अंकांनी घसरणीत राहिला होता. अमेरिकेतील नोकरीची आकडेवारी अपेक्षेsपेक्षा चांगली दिसली तरी आता लवकरच व्याजदर घटण्याची शक्यता कमकुवत दिसून आल्याने त्याने बाजारात चिंता निर्माण झाली. गुंतवणूकदारांनी नफावसुलीवर भर दिला. बँकिंग, रिअल्टी व मेटल समभागांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. सेन्सेक्समधील 30 पैकी 18 समभाग घसरणीत तर निफ्टीतील 50 पैकी 33 समभागांमध्ये घसरण दिसून आली.
शुक्रवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 400 अंकांनी घसरुन 85231 च्या स्तरावर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 124 अंकांनी घसरुन 26068 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक 480 अंकांनी कमकुवत होत 58867 अंकांवर बंद झाला. विविध निर्देशांकांची कामगिरी पाहिल्यास एफएमसीजी निर्देशांक मात्र तेजीसह बंद झाला. उर्वरीत ऑटो, कमोडिटीज, एनर्जी, फायनॅन्शीयल्स, इन्फ्रा, आयटी, मेटल, ऑईल अँड गॅस, फार्मा व रिअल्टी यांचे निर्देशांक घसरत बंद झाले. यातही फायनॅन्शीयल्स, एनर्जी व मेटल निर्देशांक सर्वाधिक घसरणीत होते.
समभागांची कामगिरी
सेन्सेक्समध्ये टाटा स्टीलचा समभाग 2.67 टक्के, एचसीएल टेकचा 2.33 टक्के, बजाज फायनान्सचा 2.25 टक्के, बजाज फिनसर्व्हचा 1.90 टक्के, इटर्नल 1.76 टक्के व आयसीआयसीआय बँकेचा समभाग 1.12 टक्के घसरणीत होता. हिंडाल्को, जेएसडब्ल्यू स्टील यांचेही समभाग घसरणीत होते. निफ्टी निर्देशांकात मॅक्स हेल्थकेअर 7 टक्के, आयशर मोटर्स 6.56 टक्के, भारती एअरटेल 2.95 टक्के, अॅक्सिस बँक 2.75 टक्के आणि पॉवरग्रिड कॉर्पचा समभाग 2. टक्के घसरला.