आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअरबाजाराची निराशा
सेन्सेक्स 452 अंकांनी घसरला, चार दिवसांच्या तेजीला विराम
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजार घसरणीसोबत बंद झाला. सलग चार सत्रामध्ये बाजाराने तेजी राखली होती. सेन्सेक्स 452 अंकांनी घसरला. पीएसयू बँक, फार्मा आणि हेल्थकेअर क्षेत्रातील समभाग चांगली कामगिरी करू शकले आहेत.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 452 अंकांनी घसरुन 83606 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 120 अंकांनी घसरत 25517 अंकांवर बंद झाला. निफ्टी बँकेचा निर्देशांक 131 अंकांनी घसरत 57312 च्या स्तरावर बंद झाला. निफ्टी मिडकॅप-100 निर्देशांक 356 अंकांनी तेजीसह 59741 च्या स्तरावर तर निफ्टी स्मॉलकॅप-100 निर्देशांक 98 अंकांनी तेजीसह 19075 अंकांवर बंद झाला. विविध क्षेत्रांचा विचार करता पीएसयू बँक, फार्मा, हेल्थकेअर क्षेत्रातील समभाग तेजीसमवेत कार्यरत होते. रियल्टी आणि ऑटो निर्देशांक मात्र काहीसा दबावात होता. सेन्सेक्समधील 30 पैकी 12 समभाग वधारत बंद झाले तर 18 घसरणीसोबत बंद झाले. ट्रेंटचा समभाग 3 टक्के आणि बीईएल व एसबीआय यांचे समभाग 2 टक्क्यांहून अधिक तेजी दाखवत बंद झाले. दुसरीकडे अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि मारुती सुझुकी यांचे समभाग दोन टक्क्यापेक्षा अधिक घसरणीत राहिले होते. निफ्टीमधील 50 समभागांपैकी 19 समभाग तेजीत, 31 समभाग घसरणीसोबत राहिले होते. आयटी आणि माध्यम निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक तेजीत होते. गेल्या चार सत्रामध्ये भारतीय शेअरबाजार सातत्याने तेजी राखून होता. मिडकॅप निर्देशांक सोमवारीही चांगल्या तेजीसोबत बंद झाला आहे. निफ्टीमधील पीएसयू बँकेचा निर्देशांक सलग पाचव्या सत्रामध्ये तेजी दाखवत कार्यरत होता. टोरेंट फार्मा ही कंपनी जेबी केमिकलमध्ये 46 टक्के इतकी हिस्सेदारी खरेदी करणार आहे. या बातमीचा परिणाम टोरट फार्माच्या समभागावर दिसून आला. जागतिक बाजारांमध्ये पाहता आशियाई बाजारात जपानचा निक्केई 0.84 टक्के तेजीत तर कोरियाचा कोस्पी 0.52 टक्के तेजीसमवेत कार्यरत होता. अमेरिकेतील डो डोन्स निर्देशांक 27 जूनला 1 टक्का वाढत बंद झाला होता. नॅसडॅक आणि एस अँड पी 500 निर्देशांकदेखील तेजीसमवेत बंद झाले होते.