For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जागतिक सकारात्मक संकेताने शेअर बाजारात सोमवारीही तेजीचाच सूर

06:03 AM Jun 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
जागतिक सकारात्मक संकेताने शेअर बाजारात सोमवारीही तेजीचाच सूर
Advertisement

सेन्सेक्स 736 अंकांनी तेजीत, ऑटो, बँकिंग समभाग चमकले, रुपया वधारला

Advertisement

वृत्तसंस्था मुंबई

अमेरिका आणि इराण याच्यातील शांती कराराच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात सोमवारीही तेजीचा सूर दिसून आला. ऑटो आणि बँकिंग समभागांची कामगिरी दमदार पहायला मिळाली. सकाळच्या सत्रामध्ये सेन्सेक्स 1100 अंकांनी तर निफ्टी 350 अंकांनी तेजीत होता.

Advertisement

सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 736 अंकांनी वाढत 76264 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 231 अंकांच्या वाढीसोबत 23853 च्या स्तरावर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक 384 अंकांच्या वाढीसोबत 57198 अंकांवर बंद होताना दिसला. ऑटो, बँक आणि रियल्टी समभागांची गुंतवणुकदारांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केलेली दिसून आली. होर्मुज खाडी लवकरच खुली होणार असल्याच्या बातमीने ब्रेंट क्रूड कच्च्या तेलाचे दर 4 टक्के घसरत 83 डॉलर प्रती बॅरलवर घसरले होते. याच दरम्यान रुपयासुद्धा 40 पैशांच्या वाढीसोबत 94.71 वर डॉलरच्या तुलनेत बंद होताना दिसला.

समभागांची कामगिरी

शेअर बाजारात सोमवारी ट्रेंट, एचडीएफसी लाईफ, श्रीराम फायनान्स, आयशर मोटर्स, इंटरग्लोब एव्हिएशन, बजाज फिनसर्व, आयटीसी, मारुती सुझुकी, अल्ट्राटेक सिमेंट, लार्सन टूब्रो, बजाज फायनान्स, टायटन, रिलायन्स, भारती एअरटेल, विप्रो, अदानी एंटरप्रायझेस, बीईएल, एसबीआय, कोल इंडिया, टीसीएस, एचडीएफसी बँक यांचे समभाग मजबुतीसोबत बंद झाले. तर दुसरीकडे एनटीपीसी, बजाज ऑटो, ओएनजीसी, टाटा कंझ्युमर्स, नेस्ले इंडिया, अपोलो हॉस्पिटल, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, हिंडाल्को, जेएसडब्ल्यू स्टील, सनफार्मा, सिप्ला, एशियन पेंटस, अदानी पोर्टस्, इंडस टॉवर, एनएमडीसी, टाटा केमिकल्स, मॅरिको यांचे समभाग घसरणीत राहिले होते.

विविध क्षेत्रांची कामगिरी

सोमवारी जागतिक तेजीच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्राचे निर्देशांकसुद्धा मजबूत होत बंद झाले. केवळ सीपीएसई व फार्मा या दोन निर्देशांकांनी निराशादायी कामगिरी केली होती. याव्यतिरिक्त ऑटो, कमोडिटीज, एनर्जी, फायनान्सीयल, एफएमसीजी, इन्फ्रा, आयटी, मेटल, रियल्टी व ऑईल आणि गॅस यांचे निर्देशांक तेजीसमवेत बंद झाले. यातही सर्वाधिक तेजी ऑटो निर्देशांकात पहायला मिळाली.

Advertisement
Tags :

.