सोमवारी दमदार तेजीसमवेत शेअरबाजार बंद
सेन्सेक्स 567 अंकांनी तेजीत, रिलायन्स समभाग चमकला
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक सकारात्मक संकेताच्या पार्श्वभूमीवर सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअरबाजार दमदार तेजीसमवेत बंद झाला. सेन्सेक्स 567 अंकांनी वाढला. दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रिज आणि भारती एअरटेल यांच्या दमदार कामगिरीचा बाजाराला फायदा झाला.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 567 अंकांनी वाढत 84778 अंकावर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 170 अंकांनी वाढत 25966च्या स्तरावर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 22 समभाग तेजीसमवेत बंद झाले तर उर्वरित 8 समभाग घसरणीत राहिले. एअरटेल, एसबीआय, रिलायन्स आणि झोमॅटो (इटरनल) यांचे समभाग 2 टक्के तेजीत होते. कोटक बँक, बीईएल आणि इन्फोसिस यांचे समभाग मात्र नुकसानीत होते. निफ्टीत पाहता 50 पैकी 38 समभागांमध्ये तेजी पहायला मिळाली. विविध क्षेत्राच्या निर्देशांकांची कामगिरी पाहिल्यास पीएसयू बँक 2.22 टक्के, रियल्टी 1.46टक्के, मेटल 1.16 टक्के आणि ऑईल आणि गॅस निर्देशांक 1.52 टक्के इतका वाढत बंद झाला.
जागतिक बाजारात उत्साह
जागतिक बाजारामध्ये पाहता अशियाई बाजारामध्ये चांगली तेजी दिसून आली. कोरियाचा कोस्पी 2.57 टक्के वाढत 4042च्या स्तरावर तर जपानचा निक्केई 2.46 टक्के वाढीसोबत पहिल्यांदाच 50512च्या स्तरावर बंद झालेला दिसून आला. हाँगकाँगचा हेगसेंग निर्देशांक 1.05 टक्के वाढत 26433 वर आणि चीनचा शांघाय कंपोझिट 1.18 टक्के वाढत 3997 च्या स्तरावर बंद झाला. 24 ऑक्टोबर रोजी अमेरिकेतील डोव्ह जोन्स निर्देशांक 1.01 टक्के वाढत 47207 वर बंद झाला. नॅसडॅक कंपोझिट 1.15 टक्के आणि एस अँड पी-500 निर्देशांक 0.79 टक्के तेजीत होता. विदेशी गुंतवणुकदारांनी 621.51 कोटींचे समभाग खरेदी केले.