मंगळवारी अल्पशा तेजीसह शेअर बाजार बंद
सेन्सेक्स 90 अंकांनी वधारला : मिडकॅप समभाग तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय शेअरबाजार काहीशा तेजीसोबत बंद झाला आहे. जागतिक बाजारात चांगली तेजी पाहायला मिळाली. मिडकॅप निर्देशांक सलग सातव्या दिवशी तेजीत होता.
मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 90 अंकांनी वाढत 83697 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 24 अंकांनी वाढत 25541 अंकांवर बंद झाला होता. सेन्सेक्समध्ये 30 पैकी 12 समभागात तेजी दिसली तर उर्वरीत 18 समभागांत घसरण दिसली. बीईएल, रिलायन्स, एशियन पेंटस् आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग 2.60 टक्के इतके वाढले होते तर दुसरीकडे ट्रेंट, अॅक्सिस बँक, इटर्नल व टेक महिंद्रा यांचे समभाग मात्र 2 टक्क्यापर्यंत घसरणीत होते.
निफ्टीची कामगिरी पाहायला गेल्यास 50 पैकी 26 समभाग घसरणीत राहिले होते. क्षेत्रांच्या निर्देशांकाची कामगिरी पाहिल्यास मीडिया 1.31 टक्के घसरणीत तर सोबत आयटी, रियल्टी व ऑटो निर्देशांकही घसरणीत बंद झाला आहे. धातू, फार्मा आणि सरकारी बँकांच्या समभागांमध्ये खरेदी पाहायला मिळाली. बँक निफ्टी 146 अंकांच्या वाढीसोबत 57459 अंकांवर बंद झाला. अपोलो हॉस्पिटलचे समभाग 3.5 टक्के वाढत 7496 अंकांवर बंद झाले होते. अपोलो हॉस्पिटलची नव्याने पुनर्रचना केली जाणार असून व्यवसाय विभागले जाणार आहेत. समभागांमध्ये पाहता आयडीएफसी फर्स्ट बँक, फेडरल बँक, कल्याण ज्वेलर्स, आयओबी, रिलायन्स, एसबीआय लाइफ, एशियन पेंटस्, बँक ऑफ महाराष्ट्र यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले. तर दुसरीकडे एसबीआय कार्ड, एनएमडीसी, सोलार इंडस्ट्रिज, भारत फोर्ज, नेस्ले इंडिया, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, टेक महिंद्रा, श्रीराम फायनान्स, ट्रेंट यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले. मिडकॅप निर्देशांक सातव्या सत्रात तेजीसह कार्यरत राहिला. पीएसयु बँकेचे समभाग खरेदी करण्यामध्ये गुंतवणूकदारांनी रस दाखवला होता.
जागतिक बाजारात अमेरिकेतील बाजार मात्र सर्वोच्च स्तरावर पोहचले होते. नॅसडॅक व एस अँड पी निर्देशांक नव्या उच्चांकावर बंद झाले होते. रुपया डॉलरच्या तुलनेत 21 पैसे मजबूत झालेला दिसून आला.