चढउतारादरम्यान शेअरबाजार अल्पशा तेजीसोबत बंद
सेन्सेक्स 78 अंकांनी वधारला, इन्फोसिसचा समभाग 7 टक्के घसरला
मुंबई :
ऑटो आणि मेटल या कंपन्यांच्या समभागांनी शेअरबाजाराला तेजी देण्याचे काम केलेले असले तरी बुधवारी आयटी समभागांनी निराशा केली. दिवसअखेर सेन्सेक्स 78 अंकांनी वाढत बंद झाला. बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 78 अंकांनी वाढत 83817 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 48 अंकांनी वाढत 25776 अंकांवर बंद झाला. दिवसभरामध्ये शेअरबाजारात चढउतार पहायला मिळाला. गेल्या दोन सत्रामध्ये शेअरबाजारात मोठी तेजी दिसून आली होती.
कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित विकासक कंपनी अॅथ्रोपिक यांनी आपले नवे एआय टूल सादर केल्याने जगभरामध्ये विशेषत: आयटी आणि टेक समभागांमध्ये घसरण दिसून आली. याचा परिणाम भारतीय शेअरबाजारातील आयटी कंपन्यांवरही पहायला मिळाला. दिग्गज कंपनी इन्फोसिसचा समभाग 7 टक्क्यांपर्यंत इंट्राडे दरम्यान खाली आला होता. सेन्सेक्स सकाळी 400 अंकांच्या घसरणीसोबत 83252 अंकांवर खुला झाला होता. निफ्टीदेखील घसरणीसोबत 25675 अंकांवर खुला झाला होता. कंझ्युमर डुरेबल, तेल आणि गॅस, मेटल आणि ऑटो क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग खरेदी करण्यामध्ये गुंतवणुकदारांनी विशेष रस घेतला होता.
निफ्टी आयटी निर्देशांक 6 टक्के घसरणीत राहिला होता. सेन्सेक्समध्ये इन्फोसिस, टीसीएस, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक यांचे समभाग घसरणीत राहिले होते. दुसरीकडे इटर्नल, ट्रेंट, एनटीपीसी, पॉवर ग्रीड कॉर्प आणि अदानी पोर्टस यांचे समभाग दमदार तेजीसोबत बंद झाले. निफ्टी मिडकॅप निर्देशांक 0.63 टक्के वाढला होता. तर निफ्टी स्मॉल कॅप निर्देशांक 1.27 टक्के तेजी दाखवत व्यवहार करत होता. जागतिक बाजारामध्ये पाहता टेक्नॉलॉजी संबंधित समभागांची अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झालेली पहायला मिळाली. डो जोन्स 0.34 टक्के घसरणीत होता. एस अँड पी 500 देखील 0.84 टक्के घसरला होता.