शेअर बाजार घसरणीसह बंद, शुल्क आकारणीचा अल्पपरिणाम
सेन्सेक्स 322 अंकांनी घसरणीत, आयटी निर्देशांक दबावात
मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह विविध देशांवर शुल्क आकारणीची टक्केवारी जाहीर केली आहे. यानंतर भारतीय शेअर बाजारात याचा फारसा परिणाम दिसला नाही. सेन्सेक्स 300 हून अधिक अंकांनी घसरणीत राहिला. गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 322 अंकांनी घसरत 76295 अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 82 अंकांनी घसरत 23250 च्या स्तरावर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 18 समभाग घसरणीसमवेत तर 12 समभाग तेजीसमवेत बंद झाले.
आयटी, ऑटो आणि बँकिंग क्षेत्रातील समभागांमध्ये सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली. टीसीएस, एचसीएल टेक आणि टेक महिंद्रा यांचे समभाग 4 टक्क्यांहून अधिक घसरणीत होते. ट्रम्प यांच्या शुल्काच्या निर्णयानंतर शेअर बाजारात फार्मा आणि उर्जा क्षेत्रातल्या समभागांमध्ये तेजी पहायला मिळाली. सकाळच्या सत्रामध्ये सेन्सेक्स 700 अंकांपर्यंत खाली जात 75811 च्या स्तरावर आला होता. मात्र नंतरच्या सत्रामध्ये सेन्सेक्स काही अंशी सावरत व्यवहार करत होता. फार्मा निर्देशांकाने तेजी राखत शेअर बाजाराला नुकसान कमी करण्यासाठी हातभार लावला.
सकाळी निफ्टी निर्देशांकही जवळपास 200 अंकांनी घसरत 23150 च्या स्तरावर खुला झाला होता. 23145 चा निच्चांकी स्तरही इंट्रा डेमध्ये निफ्टीने अनुभवला होता. आयटी समभाग टीसीएस, एचसीएल टेक, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा यांचे समभाग 4 टक्क्यांहून अधिक कोसळले होते. याचदरम्यान अमेरिकेने फार्मा उद्योगाला करापासून वगळल्याने या क्षेत्राचा निर्देशांक तेजीत पहायला मिळाला. अमेरिकेतील बाजारात मोठी पडझड पहायला मिळाली. घोषणेनंतर खुद्द अमेरिकेतील बाजारांमध्ये त्याचे नकारात्मक परिणाम पहायला मिळाले. आशियाई बाजारात जपानचा निक्केई 2.77 टक्के, चीनचा शांघाई कंपोझिट 0.24टक्के आणि हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक 1.52 टक्क्यांनी घसरला.