For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवडणूक निकालामुळे शेअरबाजार तेजीसह बंद

06:14 AM May 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
निवडणूक निकालामुळे शेअरबाजार तेजीसह बंद
Advertisement

सेन्सेक्स 356 अंकांनी वधारला, रिअल्टी, मेटल,फार्मा निर्देशांक चमकले

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

पश्चिम बंगालसह पाच राज्यांचा निकाल सोमवारी जाहीर झाला, ज्याचे परिणाम भारतीय शेअर बाजारातही दिसून आले. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स 350 हून अधिक अंकांनी वाढत बंद झाला. रिअल्टी, मेटल, फार्मा आणि ऑटो निर्देशांकातील समभागांची खरेदी मोठ्या प्रमाणात झालेली दिसून आली.

Advertisement

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 356 अंकांनी वाढत 77269 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 122 अंकांनी वाढत 24119 च्या स्तरावर बंद झाला. सुरुवातीला निवडणुकीचे निकाल आले तेव्हा सेन्सेक्स जवळपास 800 अंकांनी मजबूत होता तर निफ्टीही 250 अंकांनी तेजीत होता. रियल्टी, मेटल, फार्मा आणि ऑटो यांचे समभाग मजबुतीसोबत बंद झाले तर आयटी, सरकारी बँक आणि मीडिया यांचे निर्देशांक मात्र घसरणीसोबत बंद झाले. समभागांमध्ये पाहता अदानी पोर्ट, आयशर मोटर्स आणि जिओ फायनान्शियल यांचे समभाग तेजीसह बंद झाले तर सर्वाधिक घसरणीमध्ये कोटक बँक, भारती एअरटेल आणि डॉक्टर रे•िज लॅब्ज यांचा समावेश होता.

निफ्टी मिडकॅप-50 निर्देशांक 102 अंकांनी वाढत 16985 च्या स्तरावर बंद झाला तर निफ्टी स्मॉलकॅप-50 निर्देशांक 121 अंकांनी वाढत 24,119 अंकांवर बंद झाला. अखेरच्या टप्प्यामध्ये गुंतवणूकदारांनी नफा वसुलीवर भर दिल्यामुळे बाजारामध्ये सुरुवातीला असलेली तेजी अखेरच्या क्षणी कमी होत गेली. बीएसई सेन्सेक्स निर्देशांक सकाळी 77,257 अंकांवर खुला झाला होता तर 50 समभागांचा निफ्टी 24063 अंकांवर खुला झाला होता. विविध निर्देशांकांमध्ये पाहता रियल्टी आणि मेटल या निर्देशांकाने सर्वोत्तम कामगिरी केली.

अदानी पोर्ट आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग सर्वाधिक 5 टक्के इतके वाढीसोबत बंद झाले. कच्च्या तेलाच्या किमती 110 डॉलर प्रति बॅरलच्या खाली आल्या होत्या.

 जागतिक बाजारात तेजी

दुसरीकडे जागतिक बाजारात पाहता आशियाई बाजारामध्ये तेजी पाहायला मिळाली. दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई आणि हॉंगकॉंगचा हँगसेंग यांचे निर्देशांक तेजीसमवेत कार्यरत होते. 1 मे रोजी अमेरिकेतील बाजारातील कामगिरी पाहता डोजोन्स आणि एस अँड पी-500 निर्देशांक तेजीमध्ये होते.

Advertisement
Tags :

.