शेअरबाजार सोमवारी सपाट स्तरावर बंद
सेन्सेक्स 77 अंकांनी तेजीत, रुपया नीचांकी स्तरावर, कच्चे तेल 111 डॉलरवर पोहोचले
वृत्तसंस्था, मुंबई
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजार सपाट स्तरावर बंद झाला. सोमवारी सुरुवातीच्या सत्रामध्ये सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीत होते. कच्च्या तेलाच्या किमतीत वृद्धी आणि रुपया पुन्हा नीचांकी स्तरावर घसरल्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 77 अंकांनी वाढत 75315 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 6 अंकांनी वाढत 23649 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक 173 अंकांनी घसरणीसोबत 53537 च्या स्तरावर बंद झाला. आयटी निर्देशांक 672 अंकांच्या वाढीसोबत 28389 अंकांवर बंद झाला.
हे समभाग तेजीत
टेक महिंद्रा, इन्फोसिस, भारती एअरटेल, सनफार्मा, बजाज फिनसर्व, एचसीएल टेक हे समभाग शेअरबाजारात तेजी राखण्यामध्ये आघाडीवर होते. यासोबतच जेएसडब्ल्यू स्टील, बीईएल, अल्ट्राटेक सिमेंट, लार्सन टूब्रो, आयटीसी, नेस्ले इंडिया, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, कोटक महिंद्रा, इटर्नल, एशियन पेंटस यांचे समभागदेखील मजबुतीसोबत बंद झाले.
हे समभाग घसरणीत
शेअर बाजारात टाटा स्टील, पॉवरग्रीड कॉर्प, स्टेट बँक ऑफ इंडिया, एनटीपीसी, बजाज ऑटो आणि ट्रेंट यांचे समभाग मोठ्या प्रमाणात घसरले होते. यासोबतच कोल इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज, अॅक्सिस बँक, टाटा मोटर्स, इंडिगो, मारुती सुझुकी, एचडीएफसी लाईफ, अदानी पोर्ट, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयशर मोटर्स, ओएनजीसी, टाटा कंझ्युमर, जिओ फायनान्स यांचे समभाग कमकुवत होत बंद झाले.
विविध क्षेत्रांच्या निर्देशांकांची कामगिरी
12 क्षेत्राच्या निर्देशांकापैकी तीन क्षेत्राचे निर्देशांक तेजीत तर उर्वरित 9 क्षेत्राचे निर्देशांक घसरणीसोबत बंद झाले. आयटी, फार्मा व फायनान्सीयल या क्षेत्राचे निर्देशांक मजबुतीसोबत बंद झाले. दुसरीकडे ऑटो, कमोडिटीज, सीपीएसई, एनर्जी, एफएमसीजी, इन्फ्रा, मेटल, ऑईल व गॅस आणि रियल्टी यांचे निर्देशांक घसरणीसोबत बंद झाले. यातही सर्वाधिक घसरण ऑटो निर्देशांकात पहायला मिळाली. 446 अंकांनी घसरत हा निर्देशांक 25624 अंकांवर स्थिरावला.