सलग चौथ्या सत्रात शेअरबाजारात उत्साह
सेन्सेक्स 256 अंकांनी तेजीत : बँक निर्देशांक विक्रमावर स्वार
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजाराने तेजीची घोडदौड सोमवारीही कायम राहिली आहे. निफ्टी बँक निर्देशांकाने विक्रमी स्तरावर बंद होण्यात यश मिळवलं असून सेन्सेक्स 256 अंकांनी वाढत बंद झाला. भारतीय शेअर बाजार 8 महिन्यांच्या उच्चांकावर बंद झाल्याचे दिसून आले.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 256 अंकांनी वाढत 82445 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराच् ाा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांकही 100 अंकांच्या तेजीसह 25103 अंकांवर बंद झाला. महत्त्वाचे म्हणजे निफ्टी निर्देशांकाने 25100 चा स्तर सोमवारी राखण्यात यश मिळवलं आहे. निर्देशांकावर नजर फिरवल्यास बँकेचा निर्देशांक दमदार तेजी अनुभवलेला दिसला आणि नव्या विक्रमावर पोहचला आहे. बँक निफ्टी 261 अंकांच्या तेजीसोबत 56839 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे मिडकॅप निर्देशांक 664 अंकांची तुफानी तेजी अनुभवत 59674 च्या स्तरावर थांबलेला दिसला. निफ्टी निर्देशांकात 40 समभाग हे तेजीसोबत बंद झाले होते. बँकेसोबत वित्तसंस्थांचा सहभाग असलेला निर्देशांकही मजबुतीसोबत बंद झाला. आरबीआयच्या रेपो व सीआरआर कपातीच्या निर्णयाला उत्साहात्मक प्रतिसाद दिसून आला.
बँकेच्या कामगिरीकडे पाहता बंधन बँक, कोटक महिंद्रा, अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, पीएनबी, कॅनरा बँक, एसबीआय यांचे समभाग तेजीत होते. निफ्टीत जियो फायनॅन्शीयल 3 टक्के, बजाज फायनान्स 2.69 टक्के, ट्रेंट 2.51 टक्के, अॅक्सिस बँक 2.12 टक्के, कोटक महिंद्रा बँक 3.25 टक्के वाढत बंद झाले तर आयसीआयसीआय बँक, इटर्नल, टायटन, महिंद्रा आणि महिंद्रा, अदानी पोर्टस या सेन्सेक्समधील कंपन्यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले होते. मिडकॅपमधील कोचिन शिपयार्ड, कल्याण ज्वेलर्स, भारती हेक्साकॉम, माझगाव डॉक यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले. निफ्टी बँकेने दुसऱ्या सत्रात तेजी राखलेली दिसली.