सलग दुसऱ्या सत्रात शेअरबाजारात तेजी
सेन्सेक्स निर्देशांकात 145 अंकांची वाढ : बँकिंग समभाग चमकले
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजारात सोमवारी तेजीचा कल पहायला मिळाला. सेन्सेक्स 145 अंकांच्या वाढीसोबत बंद झाला असून बँकिंग, ऑटो कंपन्यांचे समभाग मजबुतीत दिसून आले.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 145 अंकांनी वाढत 80,664 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 84 अंकांच्या तेजीसोबत 24,586 अंकांवर बंद झालेला दिसून आला. सेन्सेक्सची ही सर्वोच्च बंद पातळी असल्याचे सांगितले जात आहे. याचदरम्यान निफ्टी निर्देशांकाने 24,635 अंकांची सर्वोच्च पातळी गाठली होती. सलग दुसऱ्या सत्रात निफ्टीने सर्वोच्च पातळी गाठली होती. बँकिंग, ऑटोसोबत ऊर्जा क्षेत्रातील समभाग चमकदार कामगिरी करत होते.
सोमवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या निर्देशांकाने 3 टक्क्यांची तेजी अनुभवली होती. ओएनजीसी, एसबीआय लाइफ, श्रीराम फायनान्स, बजाज ऑटो आणि एसबीआय हे समभाग सर्वाधिक तेजीत राहिलेले दिसले. ओएनजीसीचा समभागही सर्वाधिक 5 टक्के इतका वाढला होता. एचसीएल टेक, रिलायन्स, टीसीएस, टाटा मोटर्स, महिंद्रा आणि महिंद्रा, मारुती सुझुकी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभागही वाढत व्यवहार करत होते. तर आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, टाटा स्टील व एशियन पेंटस यांचे समभाग मात्र घसरणीत होते. सनस्टार लिमिटेडचा आयपीओ 19 जुलैला खुला होणार असून 23 तारखेपर्यंत यात गुंतवणूक करता येणार आहे. 26 जुलैला बीएसई व एनएसईवर कंपनीचा समभाग सूचीबद्ध होणार आहे. 90-95 रुपये प्रति समभाग अशी समभागाची किंमत राहणार आहे. शुक्रवारी सेन्सेक्स 622 अंकांनी वाढत 80,519 अंकांवर बंद झाला होता.
आशियाई बाजारात मिळताजुळता कल होता. हाँगकाँगचा हँगसेंग 1.29 टक्के घसरणीत होता तर चीनचा शांघाई कम्पोझीट 0.11 टक्के इतका तेजीत होता.