जागतिक संकेतामुळे शेअर बाजार तेजीत
सेन्सेक्स 122, निफ्टी 34 अंकांनी वधारला : रिलायन्स नफ्यात
वृत्तसंस्था / मुंबई
नवीन आठवड्याची सुरुवात सोमवारी घसरणीसोबत झाल्याचे दिसून आले. परंतु दुसऱ्या सत्रात मंगळवारी मात्र जागतिक पातळीवरील घडामोडींच्या सकारात्मक स्थितीमुळे बाजाराने गमावलेली तेजी पुन्हा प्राप्त केल्याचे दिसून आले. मंगळवारचे सत्र हे नेहमीप्रमाणे स्थिर नव्हते तर या दिवशी मोठ्या प्रमाणात चढउताराची स्थिती निर्माण झाली होती. मात्र जागतिक पातळीवरील मजबूत स्थितीमुळे भारतीय बाजारात उत्साहाचे वातावरण राहिले. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजमधील समभागांमधील तेजीने बाजाराला सावरले. सेन्सेक्स व निफ्टी यांच्या निर्देशांकांनी विक्रमी कामगिरी केली आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 122.10अंकांसोबत 0.17 टक्क्यांसोबत निर्देशांक 71,437.19 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला 34.45 अंकांसोबत निफ्टी वधारुन 21,453.10 वर बंद झाला आहे. काहीकाळ बाजारात सेन्सेक्सने 308.62 अंकांच्या मजबूत स्थितीसोबत 71,623.71 चा टप्पा प्राप्त केला होता.
मुख्य कंपन्यांमध्ये मंगळवारी नेस्ले, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारतीय स्टेट बँक, आयटीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, पॉवरग्रिड कॉर्प आणि बजाज फायनान्स यांचे समभाग तेजीसह बंद झाले. अन्य कंपन्यांमध्ये विप्रो, टाटा कंसल्टंसी सर्व्हिसेस, एचसीएल टेक, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह आणि मारुती सुझुकी यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत.
जागतिक बाजारात प्रभाव
जागतिक पातळीवरील मुख्य कंपन्यांमध्ये आशियातील अन्य बाजारात दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्की आणि चीनचा शांघाय कम्पोझिट हे वधारले आहेत. तर हाँगकाँगचा हँगसेंग प्रभावीत राहिला आहे. युरोपमधील बाजारात तेजीचा कल कायम राहिल्याचे दिसून आले. जागतिक स्तरावर तेल कच्चे तेल 0.30 टक्क्यांच्या घसरणीसह 77.72 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.