ऑटो, धातू कंपन्यांच्या मदतीने शेअर बाजारात तेजीचा प्रवाह
सेन्सेक्स 104 अंकांनी वधारला : टाटा स्टीलची चमक
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी भारतीय शेअरबाजार आठवड्याच्या पहिल्या दिवशी तेजीसह बंद झाला आहे. दिवसभरात बाजारात चढ-उतार पाहायला मिळाला. टाटा स्टीलचे समभाग सर्वाधिक मजबूतीसह बंद झाले.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 104 अंकांच्या तेजीसोबत 72,748 अंकांवर तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 32 अंकांनी तेजी दाखवत 22,055 अंकांवर बंद झाला होता. सकाळी शेअरबाजाराची सुरुवात नकारात्मक झाली होती. पोलाद उत्पादन क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा स्टीलचे समभाग सर्वाधिक 5 टक्के इतके वाढले होते. तर दुसरीकडे कोफोर्जचे समभाग 7 टक्के घसरुन बंद झाले. निफ्टीतील फार्मा आणि बँक निर्देशांक तेजीसोबत कार्यरत होते तर मिडकॅप 100, स्मॉलकॅप, निफ्टी आयटी व एफएमसीजी व फायनॅन्शीयल सर्व्हिसेस यांचे निर्देशांक मात्र कमकुवत दिसून आले. टाटा स्टीलसह महिंद्रा आणि महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स, अपोलो हॉस्पिटल, बजाज ऑटो आणि अॅक्सिस बँक यांचे समभाग तेजीसह बंद होण्यात यशस्वी झाले तर दुसरीकडे युपीएल, इन्फोसिस, टीसीएस, टाटा कंझ्युमर, विप्रो, टायटन आणि एचयुएल यांनी मात्र घसरणीसह बाजारात निराशादायी कामगिरी केली.
अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागावर सोमवारी दबाव दिसत होता. यातील अदानी टोटल गॅसचे समभाग 4 टक्के घसरणीसह 946 रुपयांच्या स्तरावर बंद झाले. अदानी पॉवरचे समभाग मात्र अल्प तेजीसह कार्यरत होते. जियो फायनॅन्शीयल, एनएमडीसी, ओम इंफ्रा, हिंदुस्थान झिंक, अॅक्सिस बँक, देवयानी इंटरनॅशनल, ओएनजीसी, पेटीएम, पटेल इंजिनियरिंग, लार्सन टुब्रो, एचडीएफसी लाइफ, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, टाटा टेक यांचे समभाग तेजीत होते. तर नेस्ले, एशियन पेंटस व पंजाब सिंध बँक यांचे समभाग घसरणीत होते.
जागतिक बाजारात उत्साह
जागतिक बाजारात पाहता युरोप आणि आशियाई बाजारात तेजीचा माहोल होता. अमेरिकेत मिश्र कल पहायला मिळाला. डोव्ह जोन्स 21 अंकांनी तेजीत तर नॅसडॅक 155 अंकांनी घसरणीत होता. आशियाई बाजारात पाहिल्यास निक्केई 1032 अंकांनी दमदार तेजी दर्शवत होता, याला हँगसेंग 16 अंक, कोस्पी 19 व शांघाय कम्पोझीट 30 अंकांची वाढ दर्शवत साथ दिली आहे.