For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Share Market | शेअर बाजाराचा फटका, मुख्याध्यापकाचे कुटुंब उद्ध्वस्त

11:07 AM Jun 13, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
share market   शेअर बाजाराचा फटका  मुख्याध्यापकाचे कुटुंब उद्ध्वस्त
Advertisement

पत्नी आणि मुलांना विष दिले आणि स्वतः गळफास घेऊन आत्महत्या

Advertisement

वैराग : बार्शी तालुक्यातील हत्तीज गाव एका कुटुंबाने आयुष्य संपवण्याच्या हृदयद्रावक घटनेने हादरून गेले. शेअर बाजारातील कोट्यवधींच्या तोट्याने निराशाच्या गर्तेत गेलेल्या योगेश बाळासाहेब पाटील यांनी पत्नी आणि दोन मुलांना विष दिले आणि स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ते चौगाव बुद्रुक (जि. नंदूरबार) येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. उन्हाळी सुटीमुळे ते गावी हातीज येथे आले असताना त्यांनी स्वतः सह कुटुंबासह संपवले.

मृतांमध्ये योगेश पाटील यांच्यासह पत्नी माधुरी पाटील (वय ३३), मुलगा अथर्व पाटील (वय ११) आणि शिवांश पाटील (वय ९) यांचा समावेश आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वैराग पोलिसांनी व्यक्त केला आहे. हत्तीज येथील त्यांच्या राहत्या घरी शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे दूध देण्यासाठी आलेल्या व्यक्तीने घराचा दरवाजा ठोठावला.

Advertisement

मात्र, बराच वेळ कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. घरातील सदस्यांना उठविण्यासाठी हाका मारल्या, खिडक्यांमधून आवाज दिला, तरीही हालचाल दिसून आली नाही. त्यामुळे संशय वाढला. अखेर शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. दरवाजा उघडताच समोर आलेले दृश्य पाहून उपस्थितांच्या पायाखालची जमीनच सरकली.

घरात योगेश पाटील यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. तर पत्नी आणि दोन मुले मृतावस्थेत पडलेली दिसून आली. काही क्षण परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. योगेश पाटील हे नंदुरबार जिल्ह्यातील चौगाव (बु.) येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते.

शाळांना उन्हाळी सुट्टी असल्याने ते काही दिवसांपूर्वी हत्तीज येथे आले होते. जनगणनेचे काम पूर्ण करून ते घरी रतले होते. गावात त्यांची ओळख एक शिक्षक आणि कुटुंबवत्सल व्यक्ती अशी होती. त्यामुळे या घटनेने ग्रामस्थांनाही मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या आईकडून सुमारे एक कोटी रुपयांची रक्कम त्यांना मिळाली होती.

नुकसान भरून निघेल या आशेने त्यांनी ही रक्कम पुन्हा शेअर बाजारात गुंतविल्याचे समोर येत आहे. मात्र त्यातही नुकसान झाल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली होती. याशिवाय मित्र, नातेवाईक आणि परिचितांकडूनही त्यांनी मोठ्या प्रमाणात हातउसने पैसे घेतल्याची माहिती तपासात पुढे येत आहे.

आर्थिक अडचणींचा वाढता ताण आणि सततचे नुकसान यामुळे ते अस्वस्थ आणि चिंताग्रस्त झाले होते, अशी चर्चा गावात सुरू आहे.

शेअर बाजारातील तोट्याने वाढला मानसिक ताण
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, योगेश पाटील यांना शेअर बाजारातील व्यवहारांमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले होते. सुमारे एक कोटी ऐंशी लाख रुपयांहून अधिक रकमेचे नुकसान झाल्याची चर्चा असून त्यामुळे ते गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या मानसिक तणावाखाली होते.

२२ पानी सुसाईड नोटमध्ये आर्थिक व्यवहारांचा तपशील
घटनास्थळावरून पोलिसांना तब्बल २२ पानी सुसाईड नोट सापडली आहे. या नोटमध्ये शेअर बाजारातील व्यवहार, विविध ठिकाणांहून घेतलेले पैसे, आर्थिक अडचणी आणि मालमत्तेबाबतच्या इच्छांचा तपशील लिहिल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे या पत्रात कोणालाही जबाबदार धरले नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.