स्टिंग ऑपरेशनः आव्हान-प्रतिआव्हानांचे शड्डू
स्टिंग ऑपरेशनच्या भीतीखालीच सिद्धरामय्या यांना पायउतार व्हावे लागले, असे सांगत एच. डी. कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे बोट दाखवले आहे. भाजपमधील अनेक नेत्यांचाही मुख्यमंत्र्यांच्या दिशेने रोख आहे. जे काही सुरू आहे ते कुमारस्वामी यांच्यामुळेच सुरू आहे. तेच याला कारणीभूत आहेत, असे सांगत त्यांना जबाबदार धरले जात आहे. हिंमत असेल तर आपल्याला अटक करा, आपली चौकशी करा, असे उघड आव्हानच कुमारस्वामी यांनी गृहमंत्री प्रियांक खर्गे यांना दिले आहे. बुधवारी प्रसिद्ध म्हैसूर दसरोत्सवाची जम्बो सवारी झाली. दसऱ्यानंतर स्टिंग ऑपरेशन प्रकरणाला धक्कादायक वळण लागण्याची शक्यता आहे.
कर्नाटकात स्टिंग ऑपरेशनची धग काही कमी झाली नाही. उलट त्याची तीव्रता वाढते आहे. माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी स्टिंग ऑपरेशनच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा चंग बांधला आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मात्र या मुद्द्यावर मौन बाळगले आहे. सिद्धरामय्या यांच्यावतीने बेंगळूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांची चौकशी सुरू असतानाच एच. डी. कुमारस्वामी यांनी गेल्या आठवड्यात बेंगळूर पोलीस आयुक्तांच्या कार्यालयासमोर धरणे धरले. स्टिंग ऑपरेशनमधील सहभागींना अटक करण्यासाठी पोलीस आयुक्तांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली. त्यानंतर 17 ऑक्टोबर रोजी निजद कार्यालयापासून राज्य पोलीस महासंचालकांच्या कार्यालयापर्यंत पदयात्रेने जाऊन डॉ. एम. ए. सलीम यांना निवेदन देण्यात आले.
स्टिंग ऑपरेशन प्रकरणात कुमारस्वामी यांनी घेतलेला पुढाकार लक्षात घेता त्यांना राज्य राजकारणात परतायचे आहे का? असा प्रश्न पडतो. कारण, हासनमध्ये पत्रकार परिषद घेऊन शक्तीदेवता हासनांबेच्या साक्षीने 2028 मध्ये कर्नाटकात भाजप-निजदची युती सत्तेवर येणार आहे. कुमारस्वामींचे दुसरे रूप त्यावेळी दाखवतो, अशी धमकीच त्यांनी दिली आहे. याच दरम्यान सिद्धरामय्या यांनी आपल्याविषयीचे बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित करू नये, यासाठी न्यायालयातून मनाई आदेश मिळविला आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व सिद्धरामय्या यांच्यात म्हैसूर दसरोत्सवादरम्यान भेट झाली आहे. या विषयावर चर्चाही झाली आहे. खरोखरच सरकारला स्टिंग ऑपरेशनच्या मुळापर्यंत पोहोचायचे असेल तर या प्रकरणाची चौकशी एसआयटी किंवा सीआयडीकडे सोपविण्यात आली असती. स्टिंग ऑपरेशनच्या चर्चेने संपूर्ण राजकारण ढवळून निघाले तरी चौकशी मात्र आहे तेथेच आहे.
कर्नाटकाच्या राजकारणात स्टिंग ऑपरेशनचे प्रकार काही नवे नाहीत. एखाद्या व्यक्तीच्या किंवा पक्षाच्या हातून सत्ता मिळवण्यासाठी, मिळविलेली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रकार सुरूच असतात. कधी आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्याला भ्रष्टाचार प्रकरणात अडकवून तर आणखी कधी हनीट्रॅप प्रकरणात अडकवून त्याची घोडदौड रोखली जाते. कर्नाटकात अधूनमधून स्टिंग ऑपरेशनची चर्चा होते. अनेक नेत्यांनी बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित करू नये, म्हणून न्यायालयातून मनाई मिळविली आहे. खरेतर या प्रकरणाशी आपला संबंध नाही, आपण कोठे स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकलो नाही. तरीही आपली बदनामी होऊ नये म्हणून आपण न्यायालयात धाव घेतली आहे, असे सांगून सारवासारव केली जाते. अनेक राजकीय नेत्यांना हनीट्रॅप व स्टिंग ऑपरेशनमुळे राजीनामे द्यावे लागले. राजेशाहीच्या काळात यासाठी विषकन्यांचा वापर होत होता. आता असाच प्रयोग हनीट्रॅप किंवा स्टिंग ऑपरेशन या सुधारित नावाने सुरू आहे.स्टिंग ऑपरेशनच्या भीतीखालीच सिद्धरामय्या यांना पायउतार व्हावे लागले, असे सांगत एच. डी. कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे बोट दाखवले आहे. भाजपमधील अनेक नेत्यांचाही मुख्यमंत्र्यांच्या दिशेने रोख आहे. जे काही सुरू आहे ते कुमारस्वामी यांच्यामुळेच सुरू आहे. तेच याला कारणीभूत आहेत, असे सांगत त्यांना जबाबदार धरले जात आहे. हिंमत असेल तर आपल्याला अटक करा, आपली चौकशी करा, असे उघड आव्हानच कुमारस्वामी यांनी गृहमंत्री प्रियांक खर्गे यांना दिले आहे. बुधवारी प्रसिद्ध म्हैसूर दसरोत्सवाची जम्बो सवारी झाली. दसऱ्यानंतर स्टिंग ऑपरेशन प्रकरणाला धक्कादायक वळण लागण्याची शक्यता आहे. एका खासगी वृत्तवाहिनीच्या संचालकावर गंभीर आरोप करीत कुमारस्वामी यांनी त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. ‘दसरा होऊ द्या, तुमचे दाखवतो’ असे उघड आव्हान या वृत्तवाहिनीच्या संचालकांनीही दिले आहे. त्यामुळे दसऱ्यानंतर कर्नाटकातील जनतेला आणखी काय काय बघावे लागणार? हे देवच जाणे.
स्टिंग ऑपरेशनच्या मुद्द्यावरच कुमारस्वामी व गृहमंत्री प्रियांक खर्गे यांच्यातील संघर्षही वाढला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत ज्यांचा आवाज आहे, त्या खासगी वृत्तवाहिनीच्या संचालकाला अटक करा, ही कुमारस्वामी यांची मागणी आहे. तुमच्याकडे पुरावे असतील तर द्या, आम्ही कारवाई करू, असा पवित्रा गृहमंत्र्यांनी घेतला आहे. त्या खासगी वाहिनीच्या संचालक राकेश शेट्टी यांनीही ‘होय, त्या व्हिडिओमधील आवाज आपलाच आहे. आपण फॅक्ट चेक करीत होतो’, असे जाहीर केले आहे. कधी कधी राजकीय नेत्यांमध्ये सुरू असलेला खेळ सर्वसामान्य जनतेसाठी करमणुकीचा ठरत असतो.
स्वत: मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचाही स्टिंग करण्याचा प्रयत्न झाला आहे. मुख्यमंत्र्यांनीच एका मुलाखतीत ही गोष्ट सांगितली आहे. त्यांनी केले म्हणून आपणही करायचे, हे सुरूच राहिले तर उघडे पडणाऱ्यांचीच संख्या अधिक असेल. दसऱ्यानंतर या मुद्द्यावरील संघर्ष आणखी वाढणार आहे. हे प्रकरण धसास लावण्याचा निर्णय कुमारस्वामी यांनी घेतला आहे. यासाठी दसऱ्यानंतर रस्त्यावरची लढाई लढण्याबरोबरच सीबीआय चौकशीसाठी आपली ताकद लावण्याचे कुमारस्वामी यांनी ठरविले आहे. माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या पेनड्राईव्ह प्रकरणात तर एच. डी. देवेगौडा कुटुंबीयांच्या अब्रूचे धिंडवडे निघाले होते. या प्रकरणात प्रज्ज्वलला शिक्षा झाली आहे. वक्कलिगांचे नेतृत्व कोण करणार? या मुद्द्यावरचा संघर्षही टिपेला पोहोचला आहे. यापूर्वी जे कुमारस्वामी यांच्यासोबत होते, आता ते डी. के. शिवकुमार यांच्यासोबत आहेत. स्टिंग ऑपरेशन प्रकरणात आपल्या नावाभोवती चर्चा होत असूनही सिद्धरामय्या हे मौन बाळगून आहेत. आपल्या राजकीय जीवनाच्या अखेरच्या वळणावर असताना सिद्धरामय्या यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न कोणी केले? याची चौकशी व्हायला हवी.
-रमेश हिरेमठ
