For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शुभमंगल घरोघरी...सरकारदरबारी नोंदी कमी...

10:56 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
शुभमंगल घरोघरी   सरकारदरबारी नोंदी कमी
Advertisement

अजूनही विवाह नोंदणीसाठी जनजागृतीची आवश्यकता

Advertisement

बेळगाव : हिंदू तसेच इतर पद्धतीने शहरासह ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात विवाह होत असतात. मात्र, याची नोंद सरकारदरबारी कमी असल्याचे नेहमीच दिसून आले आहे. अलीकडे काही प्रमाणात विवाह नोंदणीमध्ये वाढ झाली असली तरी प्रत्यक्षात झालेले विवाह आणि त्यांची नोंद पाहता मोठी तफावत आहे. अजूनही विवाह नोंदणीला म्हणावे तसे महत्त्व दिले जात नाही, हे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये विवाह नोंदणीचा आकडा पाहता तो फारच कमी आहे. शहरातील दोन्ही उपनोंदणी कार्यालयांमध्ये झालेल्या आकड्याची नोंदीवरून हे दिसून येत आहे. 2021-22 मध्ये 7 हजार 38 जणांनी नोंद केली आहे.  2022-23 सालात 7321 जणांनी तर 2023-24 मध्ये आतापर्यंत 7616 जणांनी उपनोंदणी कार्यालयामध्ये विवाह नोंद केली आहे. अलीकडे ग्राम लेखाधिकाऱ्यालाही विवाह नोंदणीचा अधिकार दिला आहे. त्या ठिकाणी कागदपत्रे उपलब्ध नसल्याने विवाह नोंदणीकडे ते अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.  सध्या विविध कामांसाठी विवाह नोंदणीची अट लादली जात असल्याने विवाह नोंदणीची संख्या वाढत आहे. मात्र, अजूनही याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. पासपोर्ट, आधारकार्डमधील नाव दुरुस्ती, मुलांना मिळणाऱ्या विविध योजनांसाठी तसेच पेन्शन व इतर सरकारी योजनांसाठी विवाह नोंदणी करणे गरजेचे असल्याने बरेच जण विवाह नोंदणी करत आहेत. मात्र, शेतकरी तसेच इतर कामगारवर्ग विवाह नोंदणीला म्हणावा तसा प्रतिसाद देत नसल्याचे दिसून येत आहे. शहरामध्ये दोन उपनोंदणी कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत. सध्या उत्तर उपनोंदणी कार्यालयामध्ये जास्त विवाह नोंदणी होताना दिसत आहे. दक्षिण उपनोंदणी कार्यालयामध्ये आकडेवारी फारच कमी आहे. यापुढे त्या ठिकाणीही विवाह नोंदणी वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

विवाह नोंदणी करणे महत्त्वाचे

Advertisement

विवाह नोंदणीसाठी अद्याप कोणतीच जाचक अट लादण्यात आली नाही. त्यामुळे अनेक जण विवाह नोंदणीपासून दूर राहत आहेत. विवाह झाल्यानंतर काही दिवसांतच त्याची नोंद केली तर वधू-वरालाही ते फायदेशीर ठरत असते. मात्र, अजूनही जनतेमधून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. विवाह नोंदणी करणे महत्त्वाचे असल्याचे उपनोंदणी अधिकारी विष्णू तीर्थ यांनी सांगितले.

अडचणी आल्यानंतरच विवाह नोंदणीसाठी धावपळ

सरकारी कामामध्ये काही अडचणी आल्यानंतर विवाह नोंदणीसाठी अनेक जण पुढे येत आहेत. त्यावेळी बरीच कागदपत्रे गहाळ झालेली असतात. त्यामुळे नवीन कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते. त्यासाठी धावपळ करावी लागते. तेव्हा विवाह झाल्यानंतर तातडीने कागदपत्रे जमा करून त्याची नोंद केल्यास सोयीचे ठरणार आहे.

विवाह नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे

  • जन्म दाखला
  • लग्नपत्रिका
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • पती-पत्नीचा फोटो
  • दोन साक्षीदार व त्यांची ओळखपत्रे

गेल्या तीन वर्षांत झालेली विवाह नोंदणी

उत्तर उपनोंदणी कार्यालय

  • वर्ष             हिंदू विवाह    आंतरजातीय विवाह     इतर          एकूण
  • 2021-22    6353        189          330          6872
  • 2022-23    6310        176          346          6832
  • 2023-24    5368       304          768         6440

दक्षिण उपनोंदणी कार्यालय

  • वर्ष             हिंदू विवाह    आंतरजातीय विवाह       इतर       एकूण
  • 2021-22    166          --           --           166
  • 2022-23    484          2              3              489
  • 2023-24     1210        24            42            1276
Advertisement
Tags :

.