Sthanik Swarajya Sanstha च्या निवडणूका महाविकासला जड जाणार?, महायुतीच्या बैठकीत काय ठरलं?
मंत्री मुश्रीफ आणि पालकमंत्री आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक
कोल्हापूर : जिल्हा परिषदेसह कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका, 13 नगरपालिका, पंचायत समित्या, गोकुळ आणि केडीसीसी बँकेच्या सर्व निवडणुका भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) एकत्रपणे महायुती म्हणून लढविण्याचा निर्धार महायुतीच्या नेत्यांनी केला. मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीला महायुतीचे जिह्यातील आजी-माजी खासदार-आमदार उपस्थित होते.
अवघ्या काही महिन्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपल्या असतानाच सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या या बैठकीला विशेष महत्त्व आले होते. हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गोकुळसह जिल्हा बँकेची निवडणूक महायुती म्हणून लढण्याचे ठरले.
सतेज पाटील यांनी एकटे तर एकटे लढले पाहिजे. मी विजयी होणार असे म्हणून त्यांनी सामोरे गेले पाहिजे, असा सल्ला या बैठकीनंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना दिला. या बैठकीला खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशिल माने, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राजेश क्षीरसागर, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार डॉ. सुजितकुमार मिणचेकर आदी उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरपर्यंत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षामध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीत एकतर्फी यश मिळवल्यानंतर या मिनी विधानसभांच्या निवडणुकातही महाविकास आघाडीला चितपत करण्याची व्यूहरचना महायुतीने आखली आहे.
जिल्ह्यातील सर्वच निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढू, जागा वाटपाचे सर्वांना मान्य होईल असे सूत्र ठरवले जाईल. ज्या जागांवर वादाचा मुद्दा असेल तो प्रश्न राज्यातील नेत्यांसमवेत चर्चा करुन सोडवला जाईल. अगदीच नाईलाज असेल त्या काही मोजक्या जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचाही पर्याय असेल. सर्व अंगांनी विचार करुनच निवडणुकीची रणनीती ठरवली जाईल. मात्र कोणत्याही स्थितीत एकदिलाने आणि ताकदीने जिल्ह्यातील सर्व निवडणुका लढवूया आणि जिंकूया, असा निर्धार या बैठकीत उपस्थित नेत्यांनी केला.