ZP Election 2025: जिल्हा परिषदेची निवडणूक पुन्हा लांबणीवर, इच्छुक उमेदवार अस्वस्थ
प्रभाग रचनेत जिल्हा परिषदेचे 68 तर पंचायत समितीचे 136 गण, प्रारुप मतदारसंघ जाहीर झाले
कोल्हापूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असतानाच निवडणुकीसाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात अर्जाद्वारे केली होती. या अर्जावर सुनावणी होऊन 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणूका घेण्याचे सर्वोच्च आदेश दिले आहेत.
यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर गेल्या असून इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाच ते सहा वर्षे रखडल्या होत्या. निवडणुका न झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी इच्छुकांचे लक्ष ओबीसी आरक्षण प्रश्न निकालात लागण्याकडे लक्ष लागले होते.
6 मे रोजी न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले. यामुळे राजकीय पक्षांसह या निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये खुशीचा माहोल तयार झाला. नगरसेवक आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य होण्यासाठी उमेदवारांनी तयारी सुरु केली.
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश होण्यापूर्वी विविध कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमातून इच्छुक मतदारांच्या संपर्कात होते. तर न्यायालयाच्या आदेशानंतर संपर्क अभियानाला अधिक गती दिली होती. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात मतदारापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून आला.
दरम्यान, 14 जुलै रोजी कोल्हापूर जिल्हा परिषदेची प्रभाग रचना जाहीर झाली. या प्रभाग रचनेत जिल्हा परिषदेचे 68 तर पंचायत समितीचे 136 गण, प्रारुप मतदारसंघ जाहीर झाले. त्यानंतर जुलै महिन्यात प्रारुप प्रभाग रचनेसंदर्भात हरकती मागवण्यात आल्या. विभागीय आयुक्तांसमोर आलेल्या हरकतीवर सुनावणी होऊन त्या निकालात काढल्या. तर 12 सप्टेंबर रोजी राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांचे आणि पंचायत समित्यांच्या सभापतींचे आरक्षण जाहीर झाले.
त्याप्रमाणे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षासाठी खुल्या गटातील महिलासाठी राखीव जाहीर झाले. यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी आतुर झालेल्या इच्छुक पुरुष उमेदवारांमध्ये नाराजी व्यक्त झाली. मात्र दुसऱ्या बाजूला आपल्या सौभाग्यवतींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी केली.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वसाधारण गटात इच्छुकांची संख्या अधिक असते. यावेळी अध्यक्षपदच महिलासाठी राखीव असल्याने महिला उमेदवार असली तरच अध्यक्षपदासाठी किमान पात्र असणार आहोत. त्यासाठी सर्वसाधारण पुरूष असलेल्या ठिकाणीही महिलांना उतरवण्याची मानसिकता काही खुल्या वर्गातील पुरुष उमेदवारांमध्ये बघायला मिळत आहेत.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. प्रारुप प्रभाग रचना, हरकती आणि अध्यपक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने 2025 अखेरीस निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. इच्छुकांकडून जोरदार तयारी सुरु होती. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचे मेळावे सुरु आहेत. पण मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढवण्यासाठी आतुर झालेल्या इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात अर्जाद्वारे केली होती. या अर्जावर सुनावणी होऊन 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घेण्याचे सर्वोच्च आदेश दिले आहेत. यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक पुन्हा लांबणीवर पडली आहे.
सर्किट बेंचमधील याचिकेकडेही लक्ष कागल तालुक्यातील गावांची अदलाबदल, करवीरमधील ग्रामपंचायतीही फोडणारी प्रारूप रचना आणि आजऱ्यातील एक मतदारसंघ रद्द करण्याबाबत याचिका सर्किट बेंचमध्ये दाखल झाली आहे. या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. या याचिकांचा निकाल काय लागतो याकडेही लक्ष आहे. हा निकालही राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकावर परिणाम करणारा ठरु शकतो अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. गतवेळच्या सभागृहातील
आरक्षित जागा
- सर्वसाधारण खुला प्रवर्ग 19 सर्वसाधारण महिला 20 अनुसूचित जमाती : 1
- नागरिकांचा मागास प्रवर्ग : 18 (9 पुऊष 9 महिला) अनुसूचित जाती प्रवर्ग : 9 ( 5 महिला,4 पुरूष)
प्रभागातील आरक्षण मतदार यादीकडे लक्ष
कोल्हापूर : प्रारुप प्रभाग रचनेवर आलेल्या हरकतींची संख्या पाहता प्रभाग रचनेमध्ये बदल होण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे आता इच्छुकांच्या नजरा प्रभागातील आरक्षण आणि मतदार याद्यांकडे असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने महापालिका निवडणुकीला गती येणार आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. कोल्हापूर महापालिकेचीही निवडणूक प्रक्रिया सुरु असून प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली असून यावर हरकती मागविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. प्रारुप प्रभाग रचनेवर एकूण 55 हरकती मनपा निवडणूक विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत.
22 सप्टेंबरपर्यंत या हरकतींवर सुनावणी पूर्ण करण्यासाठी वेळ आहे. यानंतर अंतिम प्रभाग रचना 23 ते 25 सप्टेंबर दरम्यान नगरविकास विभागाकडे पाठवावी लगणार आहे. 30 सप्टेंबरपर्यंत अंतिम प्रभाग रचना नगर रचना विभाग राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करेल. 9 ते 13 ऑक्टोबर दरम्यान अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होईल.
प्रभाग रचनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रभागातील आरक्षण व मतदार यादीची प्रक्रिया होईल. यासाठीही बराच कालावधी लागणार आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार 31 जानेवारीपूर्वी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या यापुढील प्रक्रिया गती प्राप्त होणार आहे