Sthanik Swarajya Sanstha निवडणुकीची लगबग सुरु, कामकाज आढावा बैठक गुरुवारी
निवडणूक आयुक्त राज्यातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत
कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. जिल्हास्तरावर प्रारूप प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने गुरूवार (दि. १०) रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. यासंदर्भातील पत्रही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक होणार आहे.
राज्यातील कोल्हापूरसह ३२ जिल्हा परिषदा, ३३६ पंचायत समित्या, २४८ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायती आणि २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका आगामी काळात होत आहेत. या निवडणुकांसाठी एकीकडे - राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.
आता राज्य निवडणूक आयोगानेही राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या - निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. १० रोजी) दुपारी १२ वाजता बैठक आयोजित केली आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा वगळून राज्यातील इतर सर्व जिल्ह्यातील निवडणूक पूर्व परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीसाठी काय तयारी करायची आणि काय माहिती घेऊन बैठकीवेळी उपस्थित राहायचे याबाबतही सांगण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२५ हाच या बैठकीचा विषय आहे. राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी याबाबतचे पत्र राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना लिहिले आहे.
कोल्हापूरच्या धर्तीवर घेणार आढावा
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे नुकतेच कोल्हापूर दौऱ्यावर येऊन गेले. यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक तयारीचा आढावा घेतला. यावेळी उपजिल्हाधिकारी संपत खिलारे यांनी माहितीचे सादरीकरण केले. त्यानुसार आता निवडणूक आयुक्त राज्यातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत.
९ जुलैपर्यंत तयारीची माहिती पाठवावी लागणार
निवडणुका घेण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, मतदार संख्या, मतदान केंद्र, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, आवश्यक मनुष्यबळ, वेळेवर उपस्थित होणारे मुद्दे या विषयाच्या अनुषंगाने माहिती तयार करून ती आयोगास पीडीएफ फॉरमेटमध्ये ई-मेलद्वारे ९ जुलै २०२५ रोजी किंवा तत्पूर्वी सादर करण्यात यावी.