कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Election 2025 : नगराध्यक्षपदासाठी फिल्डींग, चंदगडमध्ये सत्तांतरासाठी भाजपने कंबर कसली

03:18 PM May 12, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

राजकीय नेत्यांची मर्जी सांभाळत अनेकांची वाटचाल सुरू

Advertisement

By : विजयकुमार दळवी

Advertisement

चंदगड : चंदगड नगरपंचायत नगराध्यक्षपदाचे आरक्षण यावेळी खुले झाल्याने मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेकांना नगराध्यक्षपदाचे आतापासूनच वेध लागले आहेत. चंदगड शहरातील अनेकांनी नगराध्यक्षपदासाठी फिल्डींग लावण्यास सुरूवात केली आहे. राजकीय नेत्यांची मर्जी सांभाळत अनेकांची वाटचाल सुरू झाली आहे.

चंदगड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत महाविकास आघाडीने सत्ता प्रस्थापित केली होती. नगराध्यक्षासह 13 जागा महाविकास आघाडीने तर भाजपने 5 जागा मिळविल्या होत्या. नगरपंचायतीत दोन स्वीकृत सदस्य निवडलेले होते. त्यापैकी एक भाजपचे तर एक महाविकास आघाडीचे होते.

पहिल्यांदाच नगराध्यक्षपदाचे आरक्षण महिलांसाठी राखीव झाले. त्यामध्ये प्राची काणेकर यांना चंदगडच्या पहिल्या नगराध्यक्षा होण्याचा सन्मान मिळाला. चंदगड येथे एकूण 17 प्रभाग आहेत. या प्रभागाचे आरक्षण अद्याप जाहीर झालेले नाही. मात्र नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असून ते खुले असणार आहे. गेल्या 4 फेब्रुवारी 2025 रोजी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने प्रशासकाची नियुक्ती झाली आहे.

लवकरच स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होण्याचे संकेत प्राप्त झाल्याने चंदगड शहरात कार्यकर्ते अलर्ट मोडवर आले आहेत. मे महिन्यात लग्नसराईचा हंगाम सुरू असून कार्यकर्ते वधुवरांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी सरसावत आहेत. गोरगरिब कुटुंबांना मदतीचा हात देत आहेत. संभाव्य नगरसेवकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

चंदगड नगरपंचायत कार्यक्षेत्रातील प्रत्येक प्रभागात 300 ते 450 च्या दरम्यान मतदार आहेत. प्रत्येक प्रभागात इच्छुकांची गर्दी असल्यामुळे तिरंगी, चौरंगी निवडणूक लागली आणि उमेदवार वजनदार असले तर 100- 125 मते विजयासाठी पुरेशी ठरणार आहेत. त्यामुळे ही मते निश्चित करण्याची मोहीम कार्यकर्त्यांकडून आतापासूनच राबवली जात आहे. त्यामुळे आपोआपच एकाएका मतदाराला सन्मानाची वागणूक मिळत आहे.

येणाऱ्या निवडणुकीत सत्तांतर घडविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तर महाविकास आघाडी सत्ता राखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करीत आहेत. गेल्यावेळी महाविकास आघाडी एकसंघ होती. आता महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडलेली आहे. महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळाले असून त्यांचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला आहे.

या परिस्थितीत होणाऱ्या निवडणुका राजकीय परिमाणं बदलणाऱ्या ठरणार असून वैयक्तीक संबंध, राजकीय ताकद, भविष्यात होणारी स्थानिक युती याबाबी निर्णायक ठरणार आहेत. चंदगड नगरपंचायत कार्यक्षेत्रात गेल्या पाच वर्षात अनेक विकासकामे झालेली आहेत. राज्यात महाविकास आघाडीच्या सत्तेस्थापनेपासून मागील पाच वर्षात तत्कालीन चंदगडचे आमदार राजेश पाटील सत्तेत होते.

आज ते आमदार नसले तरीही त्यांचा पक्ष सत्तेत असून उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या पाठिशी आहेत. तर गेल्या नगरपंचायत निवडणुकीत निसटत्या मतांनी पराभूत झालेल्या भाजपच्या पुरस्कृत आघाडीने यावेळी सत्तांतर घडविण्यासाठी कंबर कसली आहे. अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी भाजपला थेट पाठिंबा दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते नजिकचे स्नेही असल्याचे मानले जाते. त्यामुळे तेही चंदगड नगरपंचायत निवडणुकीत आपली ताकत पणाला लावण्याची शक्यता आहे. तुल्यबळ राजकीय वातावरणात निवडणुका अपेक्षित असून निवडणुकीची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. आखाड्यात दोन्हीकडचे पैलवान तेल लावून तयारच आहेत. फक्त निवडणूक जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे.

Advertisement
Tags :
#devendra fadanvis#Mahavikas Aghadi#political parties#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaBJP Political newsChandagad nagar panchayatchandgadMahayuti
Next Article