शाळेत चोरी...कबुलीसाठीचा प्रकार अघोरी
लिंबूचा वापर करून बालमनाला घातली भीती : शिक्षणाच्या मंदिरातच अंधश्रद्धेला खतपाणी
बेळगाव : शाळेमध्ये चोरी झाल्यानंतर चक्क प्रत्येक विद्यार्थ्याला लिंबू दाखवून मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न शहरातील एका सरकारी शाळेमध्ये दोन दिवसांपूर्वी घडला. एका पालकाने घडलेल्या प्रकाराला वाचा फोडल्यानंतर ही बाब समोर आली. अंधश्रद्धेला दूर ठेवण्यासाठी शिक्षण दिले जाते. परंतु, शिक्षणाच्या मंदिरातच अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने या प्रकाराची शहरात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. विश्वेश्वरय्यानगर येथील कन्नड शाळा क्र. 26 येथे दोन दिवसांपूर्वी एका शिक्षिकेच्या पर्समधील पाच हजार रुपये चोरीला गेले. अनेकवेळा विद्यार्थ्यांना विचारूनही कोणीच कबुली देत नव्हते.
अखेर संबंधित शिक्षिकेने शाळेतील प्रत्येक वर्गात लिंबू घेऊन विद्यार्थ्यांना कबुली देण्यास सांगितले. हा प्रकार विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना सांगितल्यानंतर काही पालकांनी थेट शाळेत धाव घेतली व त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. शाळेतीलच एका विद्यार्थ्याने शिक्षिकेचे पैसे घेतले असल्याचे निष्पन्न झाले. परंतु, शाळेमध्ये लिंबू आणून विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण केल्याची तक्रार पालकांनी केली. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा हा प्रयत्न असून किमान असे प्रकार शाळेमध्ये तरी होऊ नयेत, अशी मागणी पालकांनी केली. चोरी झालेले पैसे शोधण्यासाठी अन्य उपाय होते. परंतु, लिंबू आणून त्याचा प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांवर विपरित परिणाम झाल्याने शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून कारणे दाखवा नोटीस
शाळेत झालेल्या चोरीनंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लिंबूची धास्ती दाखवल्याच्या घटनेची नोंद बुधवारी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली व संबंधित प्रकरणाची चौकशी केली. शिक्षक, तसेच मुख्याध्यापकांकडून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतल्यानंतर प्रभारी गटशिक्षणाधिकारी आय. डी. हिरेमठ यांनी संबंधित शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस पाठवली जाणार असल्याचे ‘तरुण भारत’ शी बोलताना सांगितले.
एसडीएमसीचे शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र
घडलेल्या प्रकाराबाबत काही पालकांनी शिक्षिकेला दोषी ठरविले असले तरी एसडीएमसीने मात्र संबंधित शिक्षिकेची पाठराखण केली आहे. काही पालकांकडून शिक्षिकेला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात होते. त्यामुळे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पालकांचीही चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पत्राद्वारे गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे.