For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माणसाने मन आत्मविचारावर स्थिर करण्यासाठी विचारशैली बदलली पाहिजे

06:46 AM Jun 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
माणसाने मन आत्मविचारावर स्थिर करण्यासाठी विचारशैली बदलली पाहिजे
Advertisement

मन चंचल आणि अस्थिर असते. त्याला आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करणे तसे कठीण असते ह्याची भगवंतांना जाणीव आहे. तरीही ते स्थिर करणे माणसाला सुलभ जावे म्हणून भगवंतांनी तीन युक्त्या अर्जुनाला सांगितल्या. भगवंत म्हणाले, ईश्वर आपला पाठीराखा आहे आणि तो जे घडवून आणेल ते आपल्या हिताचेच असेल अशी खात्री झाली की, मनुष्य प्रपंचाच्या काळजीतून मुक्त होतो. त्याला धीर मिळतो आणि त्या धैर्याचा उपयोग करून तो त्याचे चित्त आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करतो पण प्रपंचाची काळजी करणे हा मनुष्यस्वभाव आहे म्हणून ती सहजासहजी माणसाच्या मनातून जात नाही म्हणून ते जेथे धाव घेत असेल तेथून त्याला ओढून काढून आत्मविचारात गुंतवावे. तरीही जर ते स्थिर झाले नाही तर त्याला मोकळे सोडून द्यावे. त्याला मोकळे सोडले असता ते जेथे जेथे जाईल तेथून त्याने आत्मस्वरुपावर स्थिर व्हायचे आहे हा नियमच त्यास परत घेऊन येईल.

Advertisement

भगवंतांनी सांगितलेल्या पहिल्या युक्तीनुसार असे म्हणता येईल की, माणसाने त्याची समज किंवा विचारशैली बदलली पाहिजे. आपण कर्ते आहोत आणि आपले भलेबुरे घडवून आणणे आपल्याच हातात आहे असे माणसाला सतत वाटत असते. त्यामुळे आपले भले कसे होईल ह्या विचारात तो सतत गढलेला असतो परंतु ह्या विचाराचा पायाच मुळात चुकीचा आहे कारण मनुष्य कर्ता नसल्याने स्वत:चे भले कसे घडवून आणायचे हे त्याच्या हातात नसून ती जबाबदारी ईश्वराची असते. त्यामुळे मी कर्ता आहे हा विचार बदलून ईश्वर माझा पाठीराखा आहे. प्रारब्धाने माझ्यावर काही संकटे आली तरी ती सुसह्य करून तो माझ्या भल्याचे घडवून आणेल अशी माझी खात्री आहे, अशा पद्धतीने विचार केल्यास मनाला सतावणाऱ्या विचारांपासून सुटका होते आणि त्याचे लक्ष आत्मविचारावर स्थिर होते. येथे स्वामी समर्थांच्या वचनाची आठवण होते. ते म्हणतात, विचार बदला म्हणजे नशीब बदलेल आणि पुढे ग्वाही देतात की, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचे हे सांगणं भगवंताच्या उपायांना धरूनच आहे.

दुसऱ्या युक्तीनुसार भगवंत सांगतात की, मन आत्मविचारावर स्थिर करण्याचा साधक प्रयत्न करत असतो पण ते तेथे स्थिर न होता इतर गोष्टीवर विचार करू लागते. असे घडणार हे गृहीत धरून साधकाने सदैव सावध रहावे आणि मन आत्मविचारापासून भरकटू लागले की, त्याला ते जेथे गेले आहे तेथून परत माघारी आणावे आणि आत्मविचारात गुंतवून टाकावे. ही युक्ती परीक्षेच्यावेळी सर्वजण नकळत वापरत असतात. परीक्षेच्या तीन तासाच्या काळात आपले लक्ष फक्त पेपरात विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे ह्यावर केंद्रित झालेले असते. यदाकदाचित अन्य विचार मनात आल्यास ते लगेच झटकले जातात.

Advertisement

हे दोन्ही उपाय ज्यांना साध्य होणार नाहीत त्यांच्यासाठी भगवंत तिसरी युक्ती सांगत आहेत. ते म्हणतात मन जर अजिबातच आवरेनासे झाले तर त्याला तसेच मोकाट सोडून द्यावे. त्यामुळे ते विषयातील आनंद मिळवण्याचा प्रयत्न करू लागेल पण कधी ना कधी त्याच्या लक्षात येईल की, विषयातील आनंद हा तात्पुरता आहे त्यामुळे ते निमुटपणे जेथे कायम टिकणारा आनंद मिळतो त्या आत्मविचाराचा स्वत:हून शोध घेईल आणि त्यावर लक्ष केंद्रित करेल. भगवंतांनी हा मोठाच दिलासा आपल्यासारख्या सामान्य जनांना दिलेला आहे.

क्रमश:

Advertisement
Tags :

.