For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जनतेशी ‘कनेक्ट’ रहा

11:41 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
जनतेशी ‘कनेक्ट’ रहा
Advertisement

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची गोवा भाजपला सूचना : गोव्यात पुढील पाच वर्षांत 50 हजार कोटींची विकासकामे 

Advertisement

पणजी : राज्यातील प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी तळागाळातील जनतेशी नेहमी ‘कनेक्ट’ राहणे गरजेचे असते. येत्या तीन वर्षांत म्हणजे 2027 मध्ये गोवा विधानसभा निवडणूक होत असल्याने गोवा प्रदेश भाजपसाठी पुढील दोन वर्षे हा कठीण काळ राहणार आहे. त्यामुळे या काळात राज्याचा सर्वे करून आपली ताकद कुठे कमी पडते, हे जनतेकडूनच जाणून घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्यात कमी पडू नका. तसे झाले तर गोव्यात पुढील सरकार हे भाजपचेच असेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील भाजप नेत्यांना दिला. ताळगाव येथे काल शुक्रवारी घेण्यात आलेल्या भाजपच्या गोवा राज्य कार्यकारिणी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यासह मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपची दर्जेदार कामगिरी 

Advertisement

देशासह गोव्यात भाजप सध्या चांगल्या स्थितीत आहे. गोवा भाजपची वाढ आपण गेल्या अनेक वर्षांपासून पाहत आलेलो आहे. गेल्या 12 वर्षांच्या काळात राज्यातील भाजप सरकारने दर्जेदार कामगिरी केलेली आहे. त्याच्या आधारावर भाजपला गोव्यात निश्चित आणखी चांगले दिवस येणार आहेत.

सर्वे, कामगिरीचे ऑडिट करावे 

प्रदेश भाजपने राज्याचा सर्वे करून गेल्या काही वर्षांत आपण कुठे कमी पडलो याचा आढावा घ्यावा. यासह राज्य सरकार आणि सरकारातील घटकांच्या कामकाजाचेही ऑडिट करण्यात यावे, असे मंत्री गडकरी म्हणाले. भाजपला गोव्यात मिळालेले सुख कायमस्वरूपी टिकवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. तळागाळातील जनतेचा सर्वांगीण विकास हेच भाजपचे उद्दिष्ट्या आहे हे लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

गोव्यात पुढील 5 वर्षांत 50 हजार कोटींची कामे

पुढील पाच वर्षांत गोव्यात 50 हजार कोटींची विकासकामे करण्याचे ध्येय आपण ठेवले आहे. गोव्याला विकासाच्या बाबतीत केंद्रातून कोणत्याही प्रकारे आडकाठी येणार नाही. त्यामुळे देशातील पहिल्या पाच प्रभावी व सुंदर राज्यात गोव्याचा समावेश व्हावा, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. आर्थिक ऑडिटपेक्षा कामकाजाचे ऑडिट नेहमीच महत्त्वाचे असते. त्या दृष्टीकोनातून प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. माणूस जातीने नाही गुणांनी महत्त्वाचा ठरतो. आपण जात पाळत नाही, म्हणूनच आपणास राजकारणात आतापर्यंत यश प्राप्त झाले आहे. भाजपने मला नेहमीच ‘पार्टी विथ डिफरन्स’ची शिकवण दिल्याचेही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले.

तरुण भारत... जिव्हाळ्याचा!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या गोवा दौऱ्यात दैनिक तरुण भारतच्या गोवा आवृत्तीची प्रशंसा केली. त्यांनी शुक्रवारचे वृत्तपत्र पाहिले आणि ते बेहद्द खुश झाले. त्यांनी लागलीच किरण ठाकूर यांच्याशी फोनवरही चर्चा केली आणि त्यांना दिल्लीला येण्याचेही निमंत्रण दिले. तऊण भारत हे अत्यंत जिव्हाळ्याचे वृत्तपत्र आहे आणि आपला या वृत्तपत्राशी तसेच किरण ठाकूर यांच्याशी दृढ संबंध आहे, असे ते म्हणाले.

Advertisement
Tags :

.