मुख्यालयात वास्तव्य करा, अन्यथा कारवाई
सांगली :
प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या मुख्यालयात एक वैद्यकीय अधिकारी आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांनी वास्तव्य करावे. याकडे दुर्लक्ष केल्याचे आढळ्यास कठोर कारवाई केली जाईल. कारवाई करताना हयगय केली जाणार नाही, असा इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृसी धोडमिसे यांनी दिला.
आटपाडी तालुक्यातील करगणी येथील आयुष्मान आरोग्य मंदीरास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी अचानक भेट देऊन यंत्रणेची झाडाझडती घेतली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, तहसिलदार सागर ढवळे, गटविकास अधिकारी संदीप भंडारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साधना पवार उपस्थित होते.
घोडमिसे यांनी करगणी आरोग्य केंद्रांच्या कामकाजाची सखोल माहिती घेतली. औषध साठ्याची माहिती तपासणी केली. अंर्तगत व बाह्य स्वच्छतेची पाहणी केली. त्यानंतर रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधेबद्दल समाधान व्यक्त केले. येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे मुख्यालयात वास्तव्य करून रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देत असल्याबद्दल कौतूक केले. प्रसुतीचे प्रमाण वाढविण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन गावडे, डॉ. अजय खोत उपस्थित होते.