विविध मागण्यांसाठी कामगार खात्याला निवेदन
बेळगाव : जिल्ह्यात बांधकाम आणि रोहियो कामगारांची संख्या 15 लाखांहून अधिक आहे. या कामगारांच्या कल्याणासाठी कर्नाटक बांधकाम आणि इतर कामगार कल्याण मंडळ, बेंगळूर यांच्याकडून कामगार कल्याणासाठी यापूर्वीच बांधकाम कराच्या स्वरूपात भरपूर निधी जमा केला आहे. बांधकाम आणि इतर बांधकाम कल्याण कायदा 1996 नुसार सदर पैसे कामगारांच्या कल्याणासाठी वापरावेत. परंतु सदर पैसे कामगारांच्या कल्याणासाठी योग्यरित्या वापरले जात नाहीत. त्यातच वारंवार परिपत्रके जारी करून नवीन कागदपत्रे मागून कामगारांना त्रास दिला जात आहे. याबाबत गुरुवारी अॅड. एन. आर. लातूर यांच्या नेतृत्वाखाली बेळगावच्या कामगार उपायुक्तांना निवेदन देण्यात आले.
निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत.
यापूर्वी दिले जाणारे स्टॉयपेंड त्वरित विद्यार्थ्यांना वाटप करण्यात यावे. कामगारांना उपलब्ध असलेल्या विविध योजनांच्या लाभासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ऑनलाईनद्वारे निश्चित करण्यात आली आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून सर्व्हर व तांत्रिक समस्यामुळे याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे इच्छुकांचे अर्ज थेट स्वीकारले जावेत व पोचपावती दिली जावी. पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या बांधकाम कामगारांच्या मुलांना लॅपटॉप खरेदी करण्यासाठी 50 हजारचे अनुदान देण्यात यावे. बांधकाम कामगारांना प्लॉट खरेदी व बांधकामासाठी 50 हजारचे सहाय्यधन द्यावे.
2013 ते 2019 पर्यंत एक वर्षात 50 दिवस काम करणाऱ्या रोहियो कामगारांना बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे सदस्य बनवून कामगार कार्ड आणि कल्याण मंडळाकडून मिळणाऱ्या सामाजिक सुविधा योजनेचे सर्व फायदे देण्यात आले. परंतु 2019 पासून रोहियो कामगारांसाठी ही योजना रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ती त्वरित पुन्हा सुरू करावी. कामगार सेवा केंद्रे पुन्हा सुरू करण्यात यावेत, मृत्यू झालेल्या बांधकाम कामगाराच्या पत्नीला 5000 हजार रुपयाचे विधवा पेंशन व मुलांच्या शिक्षणासाठी सहाय्यधन द्यावे, लग्नासाठी म्हणून देण्यात येणाऱ्या 50 हजारच्या सहाय्यधनात वाढ करून ते 1 लाख रुपये करण्यात यावे, आधी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.