दोडामार्गातील रिक्त पदांविषयी पालकमंत्र्यांना निवेदन
शिवसेनेचे तालुका संघटक गोपाळ गवस यांनी वेधले लक्ष
दोडामार्ग – वार्ताहर
दोडामार्ग तालुक्यातील जनतेच्या अनेक समस्या आहेत. शिवाय जनतेच्या अनेक विभागातील अधिकाऱ्यांविषयी तक्रारी आहेत. त्यामुळे तालुक्यातील जनतेच्या इच्छेनुसार पालकमंत्री नितेश राणे यांनी दोडामार्गमध्ये सर्व विभागांची संयुक्तिक आढावा बैठक आयोजित करावी अशी मागणी शिवसेनेचे तालुका संघटक गोपाळ गवस यांनी पालकमंत्री राणे यांच्याकडे केली आहे.श्री. गवस यांनी नुकतीच मुंबई मंत्रालयात जात राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी तालुक्याच्या समस्यांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. शिवाय आढावा बैठक घेण्यात यावी अशीही मागणी केली. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, दोडामार्ग तहसीलदार पद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. सध्या तालुक्याचा कारभार प्रभारी तहसीलदार यांच्यामार्फत हाकला जात आहे. वेळोवेळी अनेकांकडून तहसीलदार हे पद भरण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. तरी याचाही आपल्या मार्फत तत्काळ भरण्यात यावा अशी मागणी गवस यांनी मंत्री राणे यांच्याकडे केली आहे.
हत्ती प्रश्न गंभीर पण...प्रभारिंकडून कारभार
तालुक्यात हत्तींच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. शिवाय हत्ती प्रश्न तालुक्यात प्रचंड गंभीर आहे. तसेच दररोज कोणत्या ना कोणत्या शेतकऱ्याचे नुकसान हे हत्ती करत आहेत. ही सर्व परिस्थिती असताना सावंतवाडी वनक्षेत्रपालांमार्फत दोडामार्ग तालुक्याचा कारभार हाकला जात आहे. ही फार दयनीय स्थिती आहे. तसेच पशुवैद्यकिय, शिक्षण, आरोग्य यासारख्या अनेक विभागात पदेही रिक्त आहेत. त्यामुळे ही पदे तात्काळ आपल्या माध्यमातून भरविण्यात यावी अशी मागणी गवस यांनी केली राणे यांच्याकडे केली आहे. तशीच तालुक्यातील अनेक समस्या निराकरण व्हावे यासाठी आढावा बैठक तुमच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यासाठी प्रशासनाला आदेश द्यावेत अशी मागणी शेवटी गवस यांनी पालकमंत्री राणे यांच्याकडे केली आहे.