‘सह्याद्रि’च्या शेअर्स हस्तांतरणाबाबत आयुक्तांना निवेदन
मसूर :
यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे सभासद असणाऱ्या ऊस उत्पादकांच्या वारसांना शेअरपासून वंचित ठेवण्यात आले आहे. याबाबत कारखान्याच्या सभासदांनी साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांना निवेदन दिले असून, साखर आयुक्तांनी या संदर्भात कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. निवासराव थोरात, उमेश मोहिते, संग्राम पवार, अमित जाधव, भरत चव्हाण, शैलेश चव्हाण, दादासाहेब चव्हाण, वसंतराव जाधव, सिद्धेश थोरात, दिग्विजय थोरात आदी उपस्थित होते.
कोणत्याही सहकारी संस्थेच्या सभासदाच्या मृत्यूपश्चात त्याचा शेअर त्याच्या वारसाचे नावे हस्तांतरीत करण्याबाबत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 30 (1) मध्ये तरतूद करण्यात आली आहे. पण सह्याद्री कारखान्याने या कायद्याचे उल्लंघन करुन कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांच्या वारसांना त्यांचे हक्कापासून वंचित ठेवले आहे.
कारखान्याच्या उपविधी क्रमांक 36(1) मध्ये स्पष्ट नमूद आहे की, ‘संचालक मंडळाने, सभासदत्वासाठी आलेल्या अर्जांवर निर्णय घेणे, भाग वाटप करणे अथवा भागाचे हस्तांतरण करणे हे आद्यकर्तव्य आहे. तसेच सभासदत्वाचा अर्ज अथवा भाग वाटप हस्तांतरण याबाबत नकार देताना त्यासंबंधीची कारणे अर्जदारास लेखी स्वरुपात कळवणे आवश्यक आहे. मात्र सह्याद्री साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने राजकीय आकसापोटी अनेक सभासदांच्या मृत्यूपश्चात त्यांचे शेअर वारसांना हस्तांतरीत केलेले नाहीत. कारखान्याचे संचालक मंडळाने ज्या अपूर्ण शेअर्सची रक्कम भरून घेतलेली नाही. अशा 2221 सभासदांची लवकरात लवकर रक्कम रोख स्वरुपात भरून घेण्याचे संबंधितांना आदेश व्हावेत. सदर सभासदांची नावे मतदार यादीत समाविष्ट करावीत.
वारसा हक्कापासून जे सभासद वंचित आहेत. त्याचप्रमाणे ज्या सभासदांची शेअर्सची अपूर्ण रक्कम भरून न घेता त्यांना राजकीय हेतूने वंचित ठेवले आहे अशा सर्व सभासदांना येणाऱ्या काळात प्रत्यक्ष भेटून त्यांना त्यांचा हक्क देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्यांच्यासाठी सह्यांची मोहीम राबवून सहकार मंत्री तसेच साखर आयुक्त यांना निवेदन देणार असल्याचे कराड उत्तर काँग्रेस अध्यक्ष निवासराव थोरात यांनी सांगितले.