गुंजीतील समस्या निवारणासाठी विधान परिषद आमदारांना निवेदन
वार्ताहर/गुंजी
गुंजी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात अनेक विकासकामे रखडली असून नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या समस्या निवारणासाठी गुंजी ग्रामपंचायत आध्यक्षा स्वाती गुरवसह ग्रामपंचायत सदस्यांनी बेळगाव विधान परिषदेचे आमदार चन्नराज हट्टीहोळी यांची खानापूर तालुक्यातील चिक्क हट्टीहोळी येथे त्यांच्या गावी भेट घेऊन समस्या निवारणार्थ रविवारी निवेदन देण्यात आले. निवेदनात काही महत्त्वाच्या समस्या मांडण्यात आल्या असून, बेळगाव-गोवा महामार्गावरील गुंजीच्या पूर्वेला जुनी पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. त्या विहिरीचे पाणी आण्यासाठी गावातील लोकांना भुयारी रस्ता द्यावा तसेच येथील देवस्थान माउलीदेवी मंदिराच्या आजूबाजूला दैविवन प्रकल्प साकारावा, प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणी करावी, त्याचबरोबर प्राथमिक मराठी शाळा गुंजी ते गुंजी रेल्वे स्टेशन रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे तसेच गुंजी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील संपर्क रस्ते व इतर समस्या निवेदनाद्वारे मांडण्यात आल्या.
कामे मार्गी लावण्याचे आश्वासन
यावेळी आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनी निवेदनाचा स्वीकार करून सदर कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर बाल कल्याण समाज विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची सुद्धा भेट घेऊन त्यांच्यासमोरही सदर समस्यांचे निवारण करण्याची विनंती करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा स्वाती गुरव, सदस्य हणमंत जोशीलकर, वनिता देऊळकर, अन्नपूर्णा मादार, गुंजीतील नागरिक लक्ष्मण मादार, वासुदेव देऊळकर उपस्थित होते.