चांगदेवनगरवासियांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अक्रम-सक्रम योजनेतून रहिवाशांना सक्रम करण्याची मागणी : बुडाविरोधात आंदोलन
बेळगाव : कणबर्गी परिसरात येणाऱ्या चांगदेवनगर येथील रहिवासी गेल्या 20 वर्षांपासून वास्तव्यास आहेत. 200 कुटुंबे वास्तव्यास असून या ठिकाणी रस्ता, गटारी, वीज आदी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. यासाठी येथील नागरिकांना कायद्यानुसार रहिवासी म्हणून नमूद करण्यात यावे, बांधलेली घरे अक्रम-सक्रम योजनेतून सक्रम करून द्यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या परिसरात येणाऱ्या सैनिक कॉलनी, चांगदेवनगर, कणबर्गी रोड, महावीर कॉलनी येथील रहिवासी गेल्या 20 वर्षांपासून वास्तव्यास आहेत. रस्ते, गटारी, वीज संपर्क तसेच गॅस कनेक्शनही आहे. गेल्या चार ते पाच निवडणुकांमध्ये नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. रहिवाशांकडून विविध प्रकारचा करही भरला जात आहे. असे असले तरी बुडाकडून 61 क्रमांक स्कीम राबविताना रहिवाशांना भिती दाखविली जात आहे. येथील रहिवाशांना कायद्यानुसार सक्रम करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
बुडाकडून दिली खोटी माहिती
बुडाकडून स्कीम क्रमांक 61 राबविताना या भागातील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जमीन संपादन करण्यात येत आहे. यापूर्वीच अनेक नागरिकांनी शेतकऱ्यांकडून बॉन्डवर जमीन खरेदी करून घरे बांधली आहेत. असे असताना बुडाकडून या भागातील जमीन संपादन करताना या ठिकाणी कोणीही वास्तव्यास नसून सदर जागा मोकळी असल्याचे सांगण्यात आले. यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बुडाकडून न्यायालयात खोटी माहिती देण्यात आली आहे. याचा निषेध करून नागरिकांकडून बुडाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. वास्तव्याला असणाऱ्या रहिवाशांना कायदेशीर करण्यात यावे, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात आली. यावेळी प्रकाश नाईक, प्रभू मुत्यप्पण्णावर, महांतेश जिरळी, बसवराज पाटील, यल्लाप्पा असोदेकर आदी उपस्थित होते.